मुहूर्ताचे ट्रेडिंग म्हणजे काय?
– या विशेष सौदाकाळात भांडवली गुंतवणूकदार आणि ट्रेडर प्रतीकात्मक ट्रेडिंग करतात, समभाग खरेदी करतात. यामुळे पुढील नवे व्यापारी वर्ष चांगले भविष्य घेऊन येईल तसेच समृद्धीचे व भरभराटीचे जाईल, अशी भांडवल बाजारातील गुंतवणूकदार व ट्रेडर यांची श्रद्धा आहे. शेअर बाजारांचे हे विशेष सत्र आर्थिक उलाढाल आणि श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ असतो.
– या मुहूर्ताच्या सौद्यांपासून हिंदू व्यापारी नववर्ष सुरू होते. यावर्षी विक्रम संवत २०२८० हे वर्ष सुरू होणार आहे. राक्षस असे या नव्या व्यापारी वर्षाचे नाव आहे.
– नव्या व्यापारी वर्षाच्या सुरुवातीला समभाग खरेदी करावी, जेणेकरून संपूर्ण वर्ष समृद्धीचे जाईल ही श्रद्धा यामागे आहे.
– या प्रकारच्या ट्रेडिंगची सुरुवात प्रथम मुंबई शेअर बाजाराने १९५७मध्ये केली. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजारानेही ही प्रथा पाडली.
मुहूर्ताचे ट्रेडिंग कसे चालते?
– यासाठी बाजार एक तास उघडला जातो. हे ट्रेडिंग वेळेच्या अनेक स्लॉटमध्ये होते. प्रत्येक स्लॉट हा भांडवली गुंतवणुकीच्या प्रत्येक प्रकारासाठी राखीव असतो. समभाग, डेरिव्हेटिव्ह, कमॉडिटी असे वेगवेगळे स्लॉट असतात.
– बाजारातील गुंतवणूकदार व ट्रेडर्स लक्ष्मीची पूजा करून मगच मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सुरुवात करतात. त्यासाठी मुंबई शेअर बाजारात मोठा समारंभ असतो.
– या एका तासात ट्रेडर समभाग खरेदी करतात, विकतात, नवी सुरुवात करतात.
– मुहूर्ताच्या सौद्यांत ऑनलाइन प्रकारेही सहभागी होता येते.
मुहूर्ताच्या सौद्यांच्या वेळा
– राष्ट्रीय शेअर बाजार रविवारी लक्ष्मीपूजनानिमित्त सायंकाळी ६ ते सव्वा सात या वेळेत मुहूर्ताच्या सौद्यांसाठी खुला राहणार आहे. याखेरीज पावणेसहा वाजता फ्युचर अँड ऑप्शन्समधील व्यवहारांसाठी राष्ट्रीय शेअर बाजारात ब्लॉक डील विंडो दिली जाणार आहे. ही विशेष सुविधा ३५ मिनिटांसाठी असेल.
– मुंबई शेअर बाजारात रविवारी सायंकाळी ६ ते सव्वा सात या वेळेत मुहूर्ताचे सौदे होतील.
– दोन्ही शेअर बाजारांत प्रत्यक्ष कामकाज सव्वा सहा ते सव्वा सात या वेळेत होणार आहे. केलेल्या व्यवहारांत फेरफार करण्यासाठी सायंकाळी ७.२५ पर्यंत वेळ देण्यात येईल.
– मुहूर्ताचा बाजार ७.२५ ते ७.३५ या काळात क्लोजिंग सेशनचे आयोजन करेल.