पश्चिम द्रुतगती महामार्गावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी पालिकेकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. गोरेगाव-मुलुंड लिंक रस्ता तसेच आरे कॉलनी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीत नवीन रस्ते विकसीत करून महामार्गावरील भार कमी केला जात आहे. या प्रयत्नात आता मालाड पश्चिमेला नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. विकास आराखडा २०३४ मध्ये मालाड पश्चिम येथील मालाड जलाशय ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या अप्पापाडापर्यंत पहिल्या टप्प्यात १८.३० मीटर मार्गाचा विकास प्रस्तावित करण्यात आला आहे. या अंतर्गत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ९०० मीटर लांबीचा हा पूल असून सिमेंट काँक्रीट, स्टीलचा वापर करून बांधण्यात येणार आहे. तसेच सिमेंट काँक्रीटचा पोहोच रस्ताही बांधण्यात येणार आहे.
गोरेगाववरून पूर्व उपनगरात मुलुंड गाठण्यासाठी जीएमएलआर बांधला जात असून या मार्गाला रत्नागिरी हॉटेलपासून हा नवीन उड्डाणपूल जोडला जाणार आहे. या पुलाचा फायदा बोरिवलीपर्यंतच्या नागरिकांनाही होणार आहे. एरवी बोरिवलीहून मुलुंडला पोहोचण्यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागतो. नवीन पुलामुळे हे अंतर पाऊण तास ते एक तासापर्यंत कमी होऊ शकेल. जीएमएलआर झाल्यानंतर नागरिकांना पूर्व द्रुतगती महामार्ग वापरण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती पालिकेच्या मालाड पी उत्तर विभागातील रस्ते खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रस्तावित उड्डाणपुलाचे डिझाइन, बांधकाम तसेच विकास आराखड्यातील ३६.६० मीटर मार्गाच्या कामासाठी अहवालाची समीक्षा, प्रकल्प अहवाल, गुणवत्ता हमी, गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता ऑडिटसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
उड्डाणपूल कुठून, कुठे?
मालाड जलाशय ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स
गोरेगाव-मुलुंड लिंक रस्त्याला जोडणार
पूल बांधकामाचा कालावधी
पावसाळा वगळून ४८ महिने
किती खर्च होणार?
१८० कोटी रुपये
पहिल्या टप्प्यात काय?
१८.३० मीटर मार्गाचा विकास
३६.६० मीटर मार्गाचे काम
९०० मीटर लांबीचा पूल
सिमेंट काँक्रीट, स्टीलचा वापर