म. टा. प्रतिनिधी, मुंबई: घटस्थापनेच्या दिवशी होणारा रिक्षा-टॅक्सीचा संप अखेर मागे घेण्यात आल्याचे शुक्रवारी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने जाहीर केले. नियोजित संप मागे घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी भाडेवाढीची टांगती तलवार कायम आहे. टॅक्सीच्या किमान भाडेदरात तीन रुपये, तर रिक्षाच्या किमान भाडेदरात दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

ऐन नवरात्रोत्सवात रिक्षा-टॅक्सी संघटनेने शहर आणि उपनगरांत संपाची हाक दिली होती. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी संघटनेला चर्चेसाठी बोलावले होते. ‘सीएनजी प्रतिकिलोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, रिक्षा-टॅक्सीचे किमान भाडे वाढले नव्हते. खटूआ समितीने दिलेल्या अहवालानुसार, इंधनदर वाढ झाल्यास किमान भाडे वाढवण्याची शिफारस आहे. सरकारने खटूआ समितीच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी दरात अनुक्रमे दोन आणि तीन रुपये वाढ करावी. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करावी. भाडेवाढ करण्याबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही’, अशी भूमिका संघटनेने ठामपणे मांडली. यानंतर उदय सामंत यांनी भाडेवाढीस सहमती दर्शवली आहे. यामुळे सोमवारपासून घोषित केलेला संप मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस एल. क्वाड्रोस यांनी दिली.

भाडेवाढ झाल्यास प्रवाशांना रिक्षासाठी २३ रुपये आणि टॅक्सीसाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या रिक्षाचे किमान भाडे २१ रुपये असून, टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये आहे. आधीच महागाईने मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे आर्थिक गणित बिघडले असताना, त्यांना आता हा दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.

भाडेवाढीवर निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला (एमएमआरटीए) आहे. प्राधिकरणाची बैठक सोमवारी पार पडणार आहे. या बैठकीत भाडेवाढीवर निर्णय घेण्यात येणार आहे, असे बैठकीत उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.