मुंडे बंधू-भगिनींनी आमची जमीन हडपली:वाल्मीक कराडच्या माणसांनी धमक्या दिल्या, प्रवीण महाजनांच्या पत्नीचा गंभीर आरोप
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर अनेक आरोप होत आहेत. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्यामुळे ते देखील अडचणीत आले आहेत. आता धनंजय मुंडे आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडेंच्या मामी आणि प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. मुंडे बंधू-भगिनींनी आमची जमीन हडपल्याचा आरोप सारंगत महाजन यांनी केला आहे. यासाठी वाल्मीक कराड माणसांनी धमक्या दिल्याचेही त्या म्हणाल्या. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. जमीन हडपल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घातला आहे. आता मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे. अजित पवार यांनी हे प्रकरण मार्गी लावून देण्याची खात्री दिली आहे. तर आता मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले. धाक दाखवून जमिनीची रजिस्ट्री केली धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी धमकी देऊन आपली जमीन हडपली, असा आरोपी प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला. वाल्मिक कराड आणि त्याच्या माणसांनी ही जमीन बळकावली, असेही त्या म्हणाल्यात. धनंजय मुंडे यांचा नोकर गोविंद मुंडे याने धाक दाखवून जमिनीची रजिस्ट्री केली. मला परळीत बोलवून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. जोपर्यंत सह्या करत नाही, तोपर्यंत परळीतून जाऊ दिले जाणार नाही, अशी धमकी दिली होती. प्रवीण महाजन जाऊन दहा वर्ष झाले तरी ही आमच्या जमिनीवर डोळा आहे, असेही त्या म्हणाल्या. साडेतीन कोटींची जमीन 21 लाखांत घेतली
सारंगी महाजन म्हणाल्या, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नंतर विसार पावती मला पाठवली. साडेतीन कोटींची जमीन ही फक्त 21 लाखांत घेतली. त्यांनी तीन दिवसांत जमिनीचाही सातबाराही बदलला. ती जमीन धनंजय मुंडेंच्या घरातील नोकर गोविंद मुंडे, त्याची सून आणि दशरथ साठे यांच्या नावावर केल्याचे सारंगी महाजन यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. धनंजय मुंडेंनी या प्रकरणी टाळाटाळ केली
पुढे बोलताना सारंगी महाजन म्हणाल्या, या प्रकरणी मी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, परंतु, ते टाळाटाळ करायला लागले. मामी, माझ्याकडे तुझा फॉलोअप कमी पडला असे त्यांनी मला सांगितले. मी धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्यानंतर मी त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी मामी काळजी करु नको. परळीत कुठलीही जमीन विकली तर ती मला कळते, असे मला म्हणाला. पण नंतर कळले की मी चोराकडेच आले, असे सारंगी महाजन म्हणाल्या. वाल्मिक कराडची कधी भेट झाली नाही, पण मला धमकवणारी माणसे ही वाल्मिक कराडची होती. यामध्ये पंकजा मुंडे यांचाही हात असल्याचा दावाही त्यांनी केला. अर्धी परळी धनंजय मुंडेंच्या ताब्यात
धनंजय मुंडे यांचे कारनामे जनतेला कळायला पाहिजे. त्यांनी परळीची बिहारपेक्षा वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. परळीतील अर्ध्याच्यावर जमिनी धनंजय मुंडेच्या ताब्यात आहेत. ते दुसऱ्याच्या नावाने जमीन घेतात, तीन वर्ष वाट पाहतात आणि त्यानंतर आपल्या ताब्यात घेतात, असा दावा सारंगी महाजन यांनी केला. त्यांनी नातेवाईकांना सोडले नाही, तर सामान्य जनतेला तो किती लुटत असेल, असेही त्या म्हणाल्या.