मनोज जरांगेंच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान:त्यांनी सकारात्मकता दाखवली, तर मी नक्कीच त्यांना भेटेन; पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे 25 जानेवारीपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणावर जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली, तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या लढ्याला यश मिळावे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे, असेही त्यांनी म्हटले. जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ध्वजारोहन केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट देण्याबाबत आपली भूमिका सांगितली. मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांनी वर्षभरापासून लढा उभारला आहे. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे, यांसह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे शनिवारपासून आंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मनोज जरांगे पाटील हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. संवैधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा, हीच माझी भूमिका आहे, असेही त्या म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, आज माझा जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तिथले वातावरण कसे असते ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेल, आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. जरांगेंचे समाधान होत नसेल तर काही करू शकत नाही
मनोज जरांगे पाटील हे सामाजिक आंदोलन आहे. सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे, आणि आम्ही त्यांना न्याय देणार आहोत. त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या आहेत, जरांगेंचे समाधान होईल, पण जर मनोज जरांगेंचे समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. मराठा समाजाकरता ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी सवलती अन् आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे. अजूनही मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील त्यावर मी काही बोलू शकणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. मनोज जरांगे – सुरेश धसांत धावण्याची स्पर्धा
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर टीका केली होती. मनोज जरांगे पाटील म्हणजे एक स्टंटबाज आहे. त्यांचे आंदोलन बिनबुडाचे आहे. हे आंदोलन म्हणजे मनोज जरांगे व सुरेश धस यांच्यातील धावण्याची स्पर्धा आहे. प्राथमिक शाळेत धावण्याची जी स्पर्धा असते तशी ही स्पर्धा आहे. या आंदोलनाला राजकीय म्हणण्यापेक्षा समाजाचा नेता कोण? हे दर्शवणारे हे आंदोलन आहे. सुरेश धस असो की जरांगे हे दोघेही पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहेत. ते लोकांची दिशाभूल करून स्वतःची पोळी भाजत आहेत, असे सदावर्ते म्हणाले होते.