पुणे: बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने डोक्यात गज मारून खून करण्यात आल्याची घटना बाणेर भागात मंगळवारी घडली. दाजीचा खून केल्यानंतर मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
धनंजय साडेकर (वय ३८) असे खून झालेल्याचे नाव आहे. साडेकर याचा खून केल्यानंतर हेमंत काजळे (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाणेरमधील श्री समृद्धी सोसायटीत ही घटना घडली. धनंजय साडेकर याचा हेमंत काजळे याच्या बहिणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर साडेकर दाम्पत्यात वाद होत होते.
बहिणीला त्रास देत असल्याचा रागातून काजळेने साडेकरला जाब विचारला. यावरून दोघात मंगळवारी वाद झाला. भांडणात काजळेने साडेकर याच्या डोक्यात गज मारला. डोक्यात गज मारल्याने साडेकर याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर या घटनेची माहिती काजळेने बहिणीला कळविली. साडेकर राहत असलेल्या सदनिकेत काजळेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साडेकर आणि काजळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.