नक्षलवाद्यांकडून माजी पंचायत समिती सभापतीची निर्घृण हत्या:पोलिस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे चिडलेल्या नक्षलवाद्यांचे खबऱ्याच्या संशयावरून क्रुर कृत्य

नक्षलवाद्यांकडून माजी पंचायत समिती सभापतीची निर्घृण हत्या:पोलिस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे चिडलेल्या नक्षलवाद्यांचे खबऱ्याच्या संशयावरून क्रुर कृत्य

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील भामरागड तालुक्यातील कियेर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (४५) यांची निर्घृण हत्या केली. पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून हे कृती करण्यात आले. घटनेचा तपशील असा की, १ फेब्रुवारी रात्री तीन नक्षलवाद्यांनी मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने उचलून नेले आणि जंगलात त्यांची गळा दाबून हत्या केली. २ फेब्रुवारी सकाळी गावाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक पत्रक ठेवले होते, ज्यात त्यांनी मडावी हे पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला. या घटनेचे मूळ कारण म्हणजे पोलिसांनी नुकतेच छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा आणि नेलगुंडा येथे पोलिस मदत केंद्र स्थापन केले होते. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांची चारही बाजूंनी कोंडी झाली होती. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले की, मृतक सुखदेव मडावी हे वास्तविक पोलिसांचे खबरी नव्हते. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, भामरागड परिसरात माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० मधील ८ सदस्यांपैकी तीन जणांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी केलेली ही पहिलीच हत्या आहे. या घटनेनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत पोलिसांनी या भागात नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर कारवाया केल्या आहेत, ज्यामध्ये अनेक जहाल माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर काहींनी आत्मसमर्पण केले. मात्र अशा परिस्थितीतही नक्षलवादी आपल्या हिंसक कारवाया सुरूच ठेवत आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment