नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या:जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मराठा समाजाचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

बीडमधील वातावरण सध्या अनेक घटनांमुळे चांगलेच ढवळून निघत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत मराठा समाजाने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली जात आहे. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच संतोष देशमुख यांनी चापट मारली होती त्यामुळे पुढील घटना घडली, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. यामुळे मराठा समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मराठा कार्यकर्त्यांनाई अहिल्यानगर पोलिस ठाण्यात निवेदन देत नामदेव शास्त्री यांनी केलेले वादग्रस्त विधान मागे घ्यावे अशी विनंती केली आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे या निवेदनात म्हंटले आहे. त्यामुळे त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे. असे न केल्यास कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असेही या निवेदनात म्हंटले आहे. अखेर त्यांच्या पोटातील ओठावर आले – मनोज जरांगे नामदेव शास्त्री यांनी केलेल्या विधानावर मनोज जरांगे यांनी टीका करत म्हंटले की, एका उच्चकोटीला पोहोचलेल्या व्यक्तीने विखारी शब्द बोलायला नको होते. अखेर त्यांच्या पोटातील ओठावर आले, असेही मनोज जरांगे म्हणाले. जे दिसायला हवे होते राज्याला ते दिसले आहे. आम्हाला जातीयवादी ठरवत होते. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून जातीयवाद सुरू झाला. त्यांचे शब्द चुकीचे होते. विखारी होते. जातीय होते. आरोपींची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची आणि संतोष भैय्याच्या मागे राहायचे नाही, हे विखारी शब्द लोकांनी पाहिले. राज्य हळहळले. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून हे शब्द आलेच कसे? एखादा नेता किंवा कार्यकर्त्याकडून एखादा शब्द जात असतो. पण उच्चकोटीच्या व्यक्तीने असे बोलणे महाराष्ट्राचे मोठे दुर्देव आहे. राजकारणासाठी हे बोलले जात आहे. या निमित्ताने पोटातील विचार ओठावर आले. राज्याने प्रत्यक्ष पाहिले.