नरेंद्र मोदी सध्या मनमोहनसिंग यांच्या भूमिकेत गेले:संजय राऊतांकडून ‘म्यूट पीएम’ असा उल्लेख; म्हणाले- मोदींनी ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत गेले आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी हे त्यांना म्युट प्राइम मिनिस्टर म्हणत होते. तेच मोदी आता का गप्प बसले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. जगभरातील सर्वच देश ट्रम्प यांनी लादलेल्या कराच्या विरोधात बोलत असताना मोदी गप्प का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदींचे भक्त त्यांना विष्णुचा अवतार म्हणत असल्याने मोदींनी ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडण्याची मागणी राऊत यांनी केली. ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादला आहे. अशा वेळी चीनने भारताला दिलेली ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारायला हवी, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली. सिंगापूर, नेपाळ, मालदीव या सारखे देश देखील ट्रम्प यांच्या विरोधात जागतिक पातळीवर आपले म्हणणे मांडत आहे. मात्र, केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसले आहेत, असा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत गेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. धीरेंद्र शास्त्रींसह भाजपवरही निशाणा भारतात धार्मिक द्वेष पसरायचा हा जर विषय असेल तर सर्वात आधी भारतीय जनता पक्षावर कारवाई करायला हवी. आधी भाजप हा पक्ष पक्ष बंद करायला हवा, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. यासंबंधी उत्तर भारतीय व्यक्तीने याचिका दाखल केली आहे. यावर संजय राऊत बोलत होते. देशात धीरेंद्र शास्त्री नावाचा एक बुवा गावात एकही मुस्लिम राहू नये, अशी भाषा करत आहेत. तो बुवा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखे बोलतो. त्याच्या दर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात. म्हणजेच त्याच्या वक्तव्याला भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे सर्वात आधी भाजपवर कारवाई करायला हवी, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.