राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा लढणार:अजित पवार यांचे संकेत; पराभवासाठी EVM ला दोष देण्यात फायदा नसल्याची विरोधकांवर टीका
राजधानी दिल्ली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्याचेही संकेत दिले. महायुतीच्या बैठकीपूर्वी अजित पवारांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्याला फारसे यश आले नाही. मात्र त्यात खचून न जाता आम्ही जोमाने विधानसभा निवडणुकीसाठी काम केले. आपले काही उमेदवार 1 लाखांच्यावर मते मिळवत विजय मिळवला आहे. ईव्हीएम मशीनवर काही लोक दोष देत आहेत, मात्र त्यात काही तथ्य नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यात काही घोळ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विरोधकांचे इतर काही राज्यात सरकार स्थापन झाले, त्यावेळी त्यांनी ईव्हीएमला दोष नाही दिले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलताना आम्ही ठरवले आहे की अजून जोमाने काम करावे लागणार आहे. आता जबाबदारी देखील वाढली आहे. आपले आता हिवाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे. डिसेंबरच्या नंतर आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करणार आहोत. त्यात जबाबदारीचे वाटप केले जाईल. महिला तसेच आता तरुण पिढीला संधी देणार असल्याचे देखील अजित पवारांनी यावेळी सांगितले. 1962 मध्ये 222 एवढे आमदार निवडून आले होते. त्यानंतर या विधानसभेत सर्वाधिक यश मिळाले आहे. लोकांनी जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिलांनी देखील मोठ्या संख्येने मतदान केले असून त्यांच्यामुळे यश मिळाले असल्याचे देखील अजित पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेल हे दरवर्षी प्रमाणे हिवाळी अधिवेशनात सगळ्या पत्रकार मित्रांना बोलवून दुपारी लंचचा कार्यक्रम करत असतात. यासाठी सुनील तटकरे यांनी मला सांगितले होते. मी त्यासाठी इथे आलो आणि पत्रकारांशी संवाद साधता येईल म्हणून इथे आल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. महायुतीच्या बैठकीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, पुढील मंत्रिमंडळ कसे असणार आहे यावर गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बसून आम्ही तिघे चर्चा करणार आहोत. कुठले मंत्रिपद कोणाकडे, कुठले खाते कोणाकडे, पालकमंत्री पद कोणाकडे, या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढील मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल.