राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट:एकनाथ शिंदेंनी दिला भाजपला पाठिंबा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लवकरच ठरणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सुनील तटकरे यांनी भेट घेतली आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. सागर या शासकीय निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत महायुतील मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले, यावेळी त्यांनी स्वागत सत्कार करत शुभेच्छा दिल्या असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर सुनील तटकरे यांनी कोकण विभागातील काही प्रश्नांबाबत अवगत केले. या हिवाळी अधिवेशन काळात या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे मोदींनी आश्वासित केले असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्याने आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पद सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना सुनिल तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. तसेच महायुतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. जे काही ठरेल ते एक दोन दिवसात ठरेल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. यापूर्वी अजित पवारांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दिला होता. यामुळे शिवसेना शिंदे गटाची मोठी गोची झाली होती. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी दावा केला जात होता. तर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली होती. यामुळे महायुतीमध्ये काही काळासाठी पेच निर्माण झाला होता. आता एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी तसेच अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अखेर त्यांची भूमिका बदलली आहे. अडीच वर्ष त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले.