दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार:नवाब मलिकांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा, अबू आझमी यांच्यावरही साधला निशाणा
माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्यांना नोटीस पाठवणार, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. माझ्यावर अशा प्रकारच्या आरोपाचा कोणताही खटला दाखल नाही. माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचा किंवा त्यासंबंधीत आरोप करणाऱ्यांवर मी न्यायिक कारवाई करणार आहे. त्यांच्याविरोधात मी न्यायालयात धाव घेणार असून त्यांच्यावर बदनामीचा खटला टाकणार आहे. कितीही मोठा नेता असला, तरी नोटीस पाठवेन, असा इशारा नवाब मलिक यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे निवडणुकीत आव्हान राहिल का? या प्रश्नावर उत्तर देतात मलिक म्हणाले की, निवडणूक हे आव्हानच असते, पण शिवाजी नगर मानखुर्द मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय लोकांच्या आग्रहास्तव घेतला आहे. आज या मतदारसंघात महिला तक्रार घेऊन गेल्यास तिचे कपडे फाडले जातात, त्यांचे नगरसेवक काठ्या घेऊन लोकांना धमकावतात, ड्रग्सचे साम्राज्य निमार्ण झाले आहे. अशाप्रकारची गुंडशाही सुरू आहे. ही गुंडशाही संपवण्यासाठी, ड्रग्समुक्त शिवाजीनगरसाठी मी निवडणूक लढत आहे आणि मी ही निवडणूक जिंकणार, असा दावा नवाब मलिक यांनी केला. सपाचे कार्यालय ड्रग्सचा अड्डा
समाजवादी पक्षाच्या कार्यलयात काही मुले ड्रग्सचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी शिवाजीनगरमधील लोकांना स्वत:च्या मुलांना सांभाळा, त्यांना समाजवादी पक्षापासून दूर राहण्यास सांगा, असे आवाहन केले. समाजवादी पक्षाचे कार्यालय ड्रग्सचा अड्डा झालेले आहे. त्यांच्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याबाबत मी लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सावध करणार आहे, असेही मलिक म्हणाले. माझ्या प्रचाराला या असा आग्रह नाही भाजपच्या नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी माझा प्रचार नाही केला तरी काही हरकत नाही. माझ्या प्रचाराला या, असा मी आग्रह देखील धरत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असून जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढत आहे. पण दाऊदशी नाव जोडणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करणार, असा पुनरुच्चार मलिकांनी केला. मी उमेदवारी मागे घेणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नात्याने निवडणूक लढत आहे, असेही ते म्हणाले. हे ही वाचा… दिवाळीत काँग्रेसला मोठा धक्का:मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश, उमेदवारी न मिळाल्याने होते नाराज राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मुंबईत मोठा झटका बसला आहे. मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोड भाजपचे कमळ हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर रवी राजा यांची भाजपच्या मुंबई उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…