महायुतीच्या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी:50 वर्षांवरील नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, इच्छुकांची धाकधूक वाढली
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी, भाजपने नव्या सरकारमध्ये काही निवडक ज्येष्ठ नेते सोडले तर तरुण आमदारांना संधी देण्याचे संकेत दिलेत. यामुळे नवे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वीच मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची धाकधूक वाढली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच संभाव्य मंत्रिमंडळाचा चेहराही यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, भाजपने भविष्यातील निवडणुकांत फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत महायुतीच्या नव्या सरकारमध्ये तरुण नेत्यांना संधी दिली जाणार आहे. तरुण नेत्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी 50 वर्षांवरील आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. यामुळे या आमदारांची धाकधूक वाढली आहे. यामुळे आज सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची गर्दी झाली आहे. या आमदारांशी चर्चा झाल्यानंतर फडणवीस दिल्लीच्या दिशेने निघाले. महायुतीचा 21 – 12 – 10 चा फॉर्म्युला सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच महायुतीमध्ये मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतून 21 – 12 – 10 असा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 व राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक दुसरीकडे, अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अजित पवार व सुनील तटकरेंसह पक्षाचे सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीवर खल केला जात असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर अजित पवार दिल्लीत एका पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. त्यात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखेच भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला समर्थन देण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपला भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले. शिंदे यांच्या माघारीमुळे फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे. हे ही वाचा… देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अडले घोडे?:विनोद तावडेंनी अमित शहांना दिलेल्या ‘फिडबॅक’मुळे अडचण, BJP नवा चेहरा देणार का? मुंबई – महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. पण आता चित्र काहीसे बदलल्याची स्थिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला महाराष्ट्रातील जातीय समीकरण साधायचे आहे. मराठा आरक्षणात भाजपचे हात पोळलेत. त्यामुळे हा भगवा पक्ष फडणवीस यांच्या नावावर अत्यंत सावधपणे पुढे जात आहे. वाचा सविस्तर