नंबर लिहिलेल्या बॅगमध्ये पार्थिव दिले, तरी 30 मृतांमध्ये नाव नाही:मौनी अमावास्येला झालेल्या चेंगराचेंगरीवर नवा गौप्यस्फोट, अद्याप आकडे नाहीत

महाकुंभमेळा क्षेत्रात मौनी अमावास्येला झालेल्या पहिल्या चेंगराचेंगरीत प्राण गेलेल्या लोकांचे नातेवाईक प्रशासनाने जारी केलेल्या ३० मृतांच्या यादीत आप्तांचा समावेश नसल्याबद्दल हैराण आहेत. प्रयागराजच्या प्रीतनगरचा रहिवासी सुमितने सांगितले की, आई नीलमचा(५७) संगमावरील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. सुमितसह ७ लोक तेथे गेले होते. धक्काबुक्कीत आईचा हात सुटला. यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयात सापडला. आईचा मृतदेह ज्या बॅगमध्ये दिला त्यावर ५ क्रमांक लिहिला. मात्र, आईचे नाव ३० जणांच्या यादीत नव्हते. वडिलांचा शोध घेतोय मुलगा; पोलिस म्हणाले, २० फोटो लावा, सापडतील बिहारचा रहिवासी रोहित यादव वडील जवाहर यादवांच्या शोधासाठी भटकत आहे. स्वरूपराणी रुग्णालय परिसरात भेटलेल्या रोहित वडिलांचे छायाचित्र आणि आधार कार्ड दाखवत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाकडे विचारपूस करत आहे. रोहित म्हणाला, २८ फेब्रुवारीला शेवटचे बोलणे झाले. संगम घाटापासून संपूर्ण मेळाक्षेत्र, पोलिस, प्रशासन, शवागार सर्व ठिकाणी शोधले, कुठेच सापडले नाहीत. एफआयआर लिहिण्यास सांगितले तेव्हा सांगितले की, लोक बेपत्ता होतात आणि सापडतात. त्यांच्या २० फोटोची प्रिंट काढून चिकटवा. सापडल्यावर सांगू. तरुण म्हणाला, वडील बेपत्ता; प्रशासन म्हणतेय, गंगेत वाहून गेले असतील मध्य प्रदेशच्या जबलपूरच्या सत्यम चौहानने २९ जानेवारीपासून वडिलांचा शोध घेण्यासाठी प्रयागराजमधील सर्व रुग्णालयांना भेट दिली. मेडिकल कॉलेजबाहेर भेटलेले सत्यम म्हणाले, वडील २८ तारखेला शेवटचे दिसले होते. यानंतर त्यांचा फोन बंद आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गंगेत वाहून गेले असतील. बोट आहे, कॅमेरे आहेत आणि माणूस वाहून गेला. मला आई नाही, बहीण आहे. तिला पाहायचे आहे, मी कुठे जाऊ? इथे कुठवर बसून राहू? प्रशासनाने एकदा सांगावे ते आता सापडणार नाहीत, तर मी मान्य करेन. मला भरपाई नको. वडिलांचा अंत्यसंस्कार करायचाय. झुंसीच्या बाजूने सेक्टर २१ मध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात आवास विकास कॉलनीतील रहिवासी नगिना मिश्रा यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे दीर गणेशचंद्र मिश्रा यांनी सांगितले की, मौनी अमावास्येला भाऊ येथे नव्हते त्यामुळे वहिनी माझ्यासोबत आल्या होत्या. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून रस्ता अडवला आणि चेंगराचेंगरी झाली. आम्ही तेथे अडकलो होतो. वहिनी वारंवार पाणी मागत होती. मी पाणी दिले. यानंतर त्या कोसळल्या. त्या चिरडल्या जाऊ नयेत यासाठी मी ७ तास तेथेच बसलो. दुकानातील कर्मचाऱ्याने खाट आणला व वहिनीला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिश्रा म्हणाले, प्रशासन कसे म्हणत की, दुसरी चेंगराचेंगरी झाली नाही.