मोहाली : रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर बाद झाले, तरी हा भारतीय संघ हार मानणारा नाही हे या सामन्यात पाहायला मिळाले. रोहित आणि विराट लवकर बाद झाले असले तरी लोकेश राहुलने यावेळी धडाकेबाज अर्धशतक साकारले, तर हार्दिक पंडया व सूर्यकुमार यादवने धमाकेदार फटकेबाजी केली. त्यामुळेच वाईट सुरुवात झाल्यानंतरही भारताला धावगती वाढवता आली. लोकेश राहुलचे धडाकेबाज अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ६ बाद २०८ अशी मोठी धावसंख्या उभारता आली. हार्दिकने यावेळी ३० चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकाराच्या जोरावर नाबाद ७१ धावांची खेळी साकारली.

पहिल्या सामन्यात भारताची दणक्यात सुरुवात झाली. रोहित शर्माने यावेळी षटकार ठोकत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण रोहितला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहित यावेळी ११ धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. रोहितनंतर विराट कोहली फलंदाजीला आला. गेल्या सामन्यात कोहलीने शतक झळकावले होते. त्यामुळे कोहली या सामन्यात कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण कोहलीला यावेळी फक्त दोन धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे भारताला एकामागून एक दोन धक्के बसले होते.

रोहित आणि विराट एकामागून एक झटपट बाद झाल्यावर भारतीय संघाचा डाव आता गडगडणार, असे वाटत होते. पण त्यावेळी भारतीय संघासाठी लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव धावून आले. या दोघांनी यावेळी कसलीही तमा बाळगली नाही. सुरुवातीपासूनच या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. राहुलने यावेळी दमदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक साकारले. राहुलचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. गेल्या सामन्यातही राहुलने अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात राहुलने ३४ चेंडूंत ५५ धावांची दमदार खेळी साकारली, यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमारने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याला सूर्यकुमारला यावेळी हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. या दोघांनी गोलंदाजीवर कडक प्रहार केला आणि संघाची धावगती चांगली वाढवली. पण सूर्यकुमार बाद झाला आणि ही जोडी फुटली. सूर्यकुमारचे अर्धशतक यावेळी फक्त चार धावांनी हुकले. सूर्यकुमारने यावेळी दोन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४६ धावांची दणदणीत खेळी साकारली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर यावेळी अक्षर पटेलला बढती देण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. पण हा निर्णय यशस्वी ठरला नाही. कारण अक्षर यावेळी फक्त सहा धावांवर बाद झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.