मुंबई- बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेचा एक काळा चेहराही आहे आणि त्याला कास्टिंग काउच या नावाने ओळखलं जातं. भूमिका मिळवण्यासाठी अनेकदा अभिनेत्रींचा गैरवापर केला जातो, पण यावर उघडपणे कुणीच बोलत नाही. मात्र काही वर्षापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने यावर मौन सोडलं. त्यानंतर मीटू चळवळ सुरू झाली आणि असा गैरप्रकार घडल्याचं अनेक अभिनेत्रींनी सांगितलं. याच मीटू चळवळीचं श्रेय तनुश्रीला दिलं जातं.


तनुश्रीने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मीटू चळवळींमुळे बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचं होत असलेलं लैंगिक शोषण उजेडात आलं. पण याची किंमत तनुश्रीला मोजावी लागत असल्याचं दिसून येत आहे. तनुश्रीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाण्यातून विष देण्याचाही प्रकार घडला तर काही दिवसांपूर्वीच तिचा अपघातही झाला. तनुश्रीनेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.


तनुश्रीने एका मुलाखतीत असं सांगितलं की, ‘उज्जैनमध्ये असताना कारचे ब्रेक फेल करण्यात आले होते. वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने मी बचावले. पण या अपघातानंतर मला बेडरेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. किरकोळ जखम झाली होती, रक्तही गेलं होतं. या अपघातातून बरी व्हायला मला खूप दिवस लागले. त्यानंतर माझ्या पिण्याच्या पाण्यात विष मिसळून मला मारण्याचाही प्रयत्न केला गेला. माझ्याकडे एक मदतनीस होती, तिच्याकरवी रोज माझ्या पाण्यात थोडं विष मिसळलं जात होतं. माझी तब्येत बिघडत चालली होती. वेळीच उपचार घेतल्याने ही गोष्ट लक्षात आली.’


तनुश्रीने सोशल मीडियावर शेअर केलं होतं की तिला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करायचं आहे, पण मनात आत्महत्येचे विचार येत आहेत इतकी मानसिक अवस्था बिकट झाली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं यामागे बॉलिवूड माफिया असल्याचंही तनुश्रीने म्हटलं आहे. मीटू चळवळीने ज्यांचं पितळ उघडं केलं ते माफिया मला त्रास देत आहेत. मला निशाणा बनवलं जात आहे असाही खुलासा तनुश्रीने केला आहे.

श्रद्धाचा नो मेकअप लूक, तरीही दिसते इतकी सुंदर

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.