हाऊसफुल शो, ‘पठाण’ने ‘बाहुबली २’ला मागे टाकले
पठाण सिनेमाकडून अशाच मिळकतीची अपेक्षा होती. सिनेमाचे २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११.३० वाजेपर्यंतचे शो होते. ‘पठाण’चे फक्त सकाळचेच शो हाऊसफुल्ल राहिले नाहीत, तर रात्री उशिराचेही शो हाऊसफुल्ल गेले होते. अनेक ठिकाणी सिनेमाची तिकिटं मिळणंही कठीण झालं आहे. ‘पठाण’ने नॉन हॉलिडे रिलीजचे सर्व रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडले आहेत. आतापर्यंत ‘बाहुबली २’ नॉन हॉलिडेला सर्वाधिक कमाई केली होती. मात्र आता ‘पठाण’ने त्यालाही मागे टाकले आहे.
‘पठाण’ ला मिळाला लाँग वीकेंड
इतकेच नाही तर ‘पठाण’ने दमदार ओपनिंगच्या बाबतीत २०१९ मध्ये रिलीज झालेल्या हृतिक रोशनच्या ‘वॉर’लाही मागे टाकले आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी ५० कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर ‘केजीएफ २’लाही ‘पठाण’ने मागे टाकले आहे. यश स्टारर ‘KGF 2’ ने पहिल्या दिवशी ५२ कोटींची कमाई केली. पण त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी होती. २६ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ‘पठाण’ प्रदर्शित झाला असता तर तो सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला नसता. पण एक दिवस आधी म्हणजेच २५ जानेवारीला रिलीज झाल्यामुळे ‘पठाण’ला चांगला फायदा मिळाला. कारण आता या सिनेमाला मोठा वीकेंड मिळाला आहे.
मागणीनुसार वाढवले शो
‘पठाण’मध्ये दीपिका पादुकोणचीही भूमिका आहे. याशिवाय सलमान खानचा एक मोठा कॅमिओही आहे. २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा देशभरात ५ हजार ५०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला. मात्र आता जनतेची मागणी लक्षात घेऊन मध्यरात्रीचे शोही सुरू करण्यात आले आहेत. २६ जानेवारीपासून यशराज फिल्म्सने ‘पठाण’चे शो देशभरात रात्री १२.३० पर्यंत वाढवले आहेत.