पुणे, येरवडा : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असे नेहमी म्हणतात. प्रेमात आकंठ बुडालेले प्रियकर आणि प्रेयसी कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार असतात आणि एकमेकांना भेटण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. कधी कधी त्यांचा हा जुगाड चालून जातो, मात्र कुणी पकडल्यानंतर त्यांची तारांबळ होते. असाच काहीसा प्रकार पुणे शहरात घडला आहे.

अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या शाळेत बुरखा घालून गेला. मात्र, त्याची ही बनवाबनवी चालली नाही. परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. बघता-बघता लहान मुले पळवणारी टोळी आली अशी अफवा परिसरात पसरली. त्यामुळे काहींनी या तरुणावर हात साफ करून घेतला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकारामुळे तरुणाची फजिती झाली. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील इंदिरानगरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. विजय अमृत वाघारी (वय २३, रा. कामराजनगर, येरवडा) असे या प्रियकराचे नाव आहे. पाठलाग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी विजयवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजयचे आदर्श इंदिरानगर परिसरातील शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांना भेटत असत आणि फिरण्यासाठी जात असत. काही दिवसांनी दोघांच्या प्रेमाची कुणकुण कुटुंबीयांना लागली.

कुटुंबीयांनी दोघांनाही समज देऊन एकमेकांना भेटण्यासाठी मज्जाव केला. प्रेयसीला भेटता येत नसल्याने विजय वेडापिसा झाला होता. म्हणून त्याने चक्क बुरखा घालून तिच्या शाळेत जाण्याचा बेत ठरवला. मात्र, तो त्याच्या अंगलट आला. मुले चोरणाऱ्या टोळीचा सदस्य समजून परिसरातील नागरिकांनी त्याला चोपून काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *