कर्जत तालुक्यात अजित पवार यांच्या अधिपत्याखालील अंबालिका शुगर हा खासगी कारखाना आहे. तेथे एका वाहनाच्या शोरुमच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले होते. पवार यांच्या कार्यकर्त्याने हे शो रूम सुरू केले. हा कार्यकर्ता फाळके यांच्याही जवळचा आहे. त्यामुळे त्यांनाही त्याने निमंत्रण दिले होते. फाळके आणि अजितदादा दोघांनाही निमंत्रण स्वीकारले आणि दोघेही एकत्र आले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार प्रथमच कर्जत तालुक्यात आले होते. त्यानिमित्त त्यांचे स्वागत करण्यात आले. फाळके यांच्या हस्तेच त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. औपचारिक कार्यक्रमासोबतच या दोघांत अनौपचारिक चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रम राजकीय नसला तरी या दोघांना एकत्र पाहून तालुक्यात राजकीय चर्चा मात्र सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर फाळके यांनी अद्यापही पवार यांच्यासोबत कायम असल्याचे सांगितले आहे. मधल्या काळात त्यांनाही अजितदादा यांच्या गटात घेण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे हे दोनच आमदार पवार यांच्यासोबत राहिले आहे. राष्ट्रवादीच्या अन्य आमदारांनी आधीच अजितदादा यांच्या गटात प्रवेश केला आहे. इतरही अनेक पदाधिकाऱ्यांच्या अजित पवार यांच्यासोबत भेटी घडवून आणून त्यांचाही प्रवेश घडवून आणण्याचे काम सुरू आहे. अशातच आता अजितदादा गटाने पवार यांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले फाळके यांच्यासाठीही गळ टाकल्याचे सांगण्यात येते. फाळके पवार यांचे निष्ठावंत मानले जात असले तरी जिल्हाध्यक्षपदाशिवाय त्यांच्या पदारात फारसे काही पडलेले नाही.
महाविकास आघाडीची सत्ता असल्याच्या काळातही फाळके बाजूला पडले होते. जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना मतदारसंघातही फारसे विचारात घेतले जात नसल्याचे यापूर्वी दिसून आले होते. एका बाजूला पवार यांच्यासोबतची निष्ठा आणि दुसरीकडे राजकीय करिअर अशा पेचात सापडलेले फाळके काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. स्वत: फाळके यांनी मात्र या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे.