राहुल गांधींच्या नेतृत्वात जन आंदोलन करणार:बॅलट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी सह्यांची मोहीम, नाना पटोलेंची माहिती
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून महायुतीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, महायुतीला मिळालेल्या या यशावर महाविकास आघाडीने इव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. तसेच निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची देखील मागणी केली जात आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले, जनतेचा आवाज बनून आम्ही आता जनआंदोलन सुरू करणार आहोत. जनतेला वाटत आहे की निवडणूक बॅलट पेपरवर घेण्यात यावी. बॅलट पेपरवरील निवडणुकांसाठी सह्यांची मोहीम आम्ही राबवणार आहोत. मतदान करण्याचा अधिकार आहे मात्र मशीन आमचे मत चोरत असल्याची भावना जनतेत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जनआंदोलन आम्ही सुरू करणार आहोत. तसेच आम्ही निर्णय घेतला आहे की राहुल गांधी यांचे जन आंदोलन हे महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात असणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून त्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे संकेत पत्रकार परिषदेत दिले आहेत. या आधी अजित पवारांनी देखील भाजपलाच पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता तसेच शिंदेंनाच मुख्यमंत्री करा, असा आग्रह देखील शिवसेनेने केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका बदलली असून भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदासाठीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसत आहे.