म.टा. प्रतिनिधी, नागपूर

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिलांच्या शस्त्रक्रियेस ऐनवेळी नकार देत ग्रामीण भागातील रुग्णालयातून काढता पाय घेणाऱ्या या बिस्किटप्रिय सरकारी डॉक्टरने दिलगिरी व्यक्त केली आहे. आपली प्रकृती बरी नसल्याने आपण गेलो, पण काहीच वेळाच परत येऊन आपण शस्त्रक्रिया पूर्ण केल्या, झाल्या प्रकाराबाबत आपण शस्त्रक्रियेस आलेल्या महिलाव व त्यांच्या नातेवाईकांची माफी मागतो, अशी लेखी दिलगिरी या डॉक्टरने व्यक्त केली आहे.

डॉ. तेजराम भलावे, असे या डॉक्टरचे नाव आहे. खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी डॉ. भलावे हे आठ महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी भारती नितेश कानतोडे (रा. पाहुनी), प्रतिमा प्रमोद बारई (रा. ढोलमारा), करिष्मा श्रीधर राजू (रा. खात) आणि सुनिता योगेश झांजोडे या चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली. यादरम्यान वेळेवर चहा न मिळाल्याने डॉ.भलावी हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत.

शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला तशाच ताटकळत राहिल्या. या असंवेदनशील प्रकारावरून संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी चौकशीचे आदेश देत तीन सदस्यांची समिती स्थापन केली. भलावे यांनी या समितीपुढे आपला माफीनामा सादर केल्याचे कळते. या शस्त्रक्रियेपूर्वी आपण दहेगाव रंगारी येथून शस्त्रक्रिया पूर्ण करून आलो होतो. आपल्याला मधुमेह असून रक्तशर्करा कमी झाल्याने आपल्याला वेळेवर चहा व बिस्किटे वेळेवर लागतात. ती न मिळाल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने आपल्याला परत जावे लागले. आपल्यामुळे संबंधित महिला व त्यांच्या नातेवाईकांना झालेल्या त्रासाबाबत आपण माफी मागत असल्याचे भलावे यांनी आपल्या स्पष्टीकरणात नमूद केले आहे.

शस्त्रक्रिया केल्या तरीही कारवाईचा प्रस्ताव?

भलावे शस्त्रक्रिया सोडून निघून गेल्याने आरोग्य विभागाने तातडीने दुसऱ्या डॉक्टरांची सोय केली. मात्र, काही वेळात परत येत भलावे यांनीच या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. तरीसुद्धा ऐनवेळी शस्त्रक्रियेतून माघार घेणे ही बाब अक्षम्य असल्याने प्रशासनातर्फे राज्य सरकारकडे त्यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *