मुंबई: प्रदूषणामध्ये मुंबईची वाटचाल दिल्लीच्याच दिशेने होत असल्याने आता सरकारी विभागांपाठोपाठ वाहतूक पोलिसांनीही शड्डू ठोकला आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण थोपवण्यासाठी उद्या, गुरुवारपासून वाहतूक पोलिसांनाही कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीयूसी नसलेल्या वाहनांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय रेडीमिक्स, काँक्रीटचे ट्रक, मिक्सर तसेच सायलेन्सरमध्ये छेडछाड करणारेही पोलिसांच्या निशाण्यावर असणार आहेत. त्यामुळे कारवाई टाळायची असल्यास वाहने तपासून घ्या, असे वाहतूक पोलिसांनी बजावले आहे.

मुंबईत प्रदूषणाची पातळी दिवसागणिक वाढत आहे. हवेचा दर्जा खालावण्यामागे वाहनांमुळे होणारे प्रदूषणही कारणीभूत ठरत असल्याने मुंबई वाहतूक पोलिस सतर्क झाले आहे. वाहतूक शाखेचे सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी सक्त कारवाईबाबतच्या सूचना पोलिसांना जारी केल्या आहेत. वाहन वायू प्रदूषण करीत असल्यास त्यास पीयूसी दिली जात नाही. असे वाहनचालक पीयूसीविनाच वाहन चालवतात. अशा वाहनांपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांच्यावर उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रदूषणाचे प्रमुख कारण ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे हे होय. या बांधकाम ठिकाणी रेडीमिक्स, काँक्रीट भरून नेताना ट्रक, मिक्सर आच्छादित केले जात नाहीत. अशा वाहनांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

व्यावसायिक वाहनांना आठ वर्षांची फिटनेस मर्यादा आहे. मात्र अनेक वाहने फिटनेस मर्यादा ओलांडूल्यानंतरही फिटनेस प्रमाणपत्र काढत नाहीत. अशी वाहने ताब्यात घेऊन परिवहन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये कटआउटचा वापर करून सायलेन्सरऐवजी इतर मार्गातून धूर काढण्यास जागा केली जाते. हा धूर देखील प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरतो. त्यामुळे अशा वाहनांचे कटआऊट, सायलेन्सर जप्त करण्यात येणार आहेत

पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष

प्रदूषणामुळे वाहतूक पोलिसांना श्वसन आजार, डोळ्यांना त्रास तसेच इतर आजार होतात. त्यातच सध्याची हवा फार वाईट असल्याने त्याचे विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे कर्तव्यावरील सर्व वाहतूक पोलिसांना मास्कचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ठराविक कालावधीत नियमित वैद्यकीय तपासणी करावी अशाही सूचना वाहतूक पोलिसांना करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *