सोलापूर : सोलापूर शहरात 21 सप्टेंबर रोजी पहाटे दशरथ नागनाथ नारायणकर नामक व्यक्तीचा खून झाला होता. क्राईम ब्रँचने २४ तासांत या खुनाचा छडा लावत गुन्हा उघडकीस आणला आहे. मयत दशरथची पत्नी अरुणा नारायणकर आणि तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी संगनमत करुन दशरथ नारायणकर याची गळा चिरुन हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पत्नी अरुणाने पतीचे डोके धरले, तर प्रियकर बाबासो चाकूने गळा चिरत होता. कट रचून अत्यंत थंड डोक्याने दोघांनी त्याची हत्या केली.

लग्नानंतर अरुणाचे अनैतिक संबंध

मयत दशरथ नारायणकर हा मूळचा अक्कलकोट तालुक्यातील डोंबारजवळगे येथील रहिवासी होता. अरुणा आणि दशरथ यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला होता. लग्नाच्या चार वर्षांनंतर अरुणा आणि गावातील बाबासो बाळशंकर यांचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. या अनैतिक संबंधाबाबत पती दशरथला माहिती मिळाली असता बाबासोने गाव सोडले. सोलापुरातील जुना विडी घरकुल येथील केकडे नगर येथे नारायणकर दाम्पत्य राहावयास होते. दशरथ नारायणकर हा लग्नानंतर काही वर्षे डोंबारजवळगे (ता अक्कलकोट ) येथे राहावयास होता. अनैतिक संबंधाची बाब पती दशरथ नारायणकर याला कळताच त्याने विरोध केला होता. सोलापुरात राहावयास आल्यानंतरही बाबासो बाळशंकर अरुणाला भेटायला येत होता.

मध्यरात्री पतीचा गळा चिरला

अरुणा आणि बाबासो बाळशंकर याने दशरथचा काटा काढण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी कट रचला होता. त्यासाठी दोघांनी मिळून डी मार्ट मधून नायलॉनची दोरी, चाकू आणि एका मेडिकल दुकानातून झोपेच्या गोळ्या खरेदी केले होते. हत्या करण्याच्या रात्री व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. बाळशंकर येणार होता म्हणून तिने घराचे दार देखील आतून बंद केले नव्हते.

21 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अरुणा आणि बाबासो बाळशंकर या दोघांनी मिळून दशरथ नारायणकर याची गळा चिरून हत्या केली. हत्या करताना अरुणाने पती दशरथचं डोकं धरलं होतं. बाबासो बाळशंकर हा गळा चिरत होता. हत्येनंतर अरुणाने स्वतः पोलिसांना माहिती दिली. माझ्या पतीला कोणीतरी अज्ञात इसमाने पैशाच्या कारणावरून ठार केले आहे, असा कांगावा तिने केला. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अरुणा नारायणकर हिचा जबाब घेतला व तपास सुरू केला. बुधवारी दिवसभर अरुणा ही पोलिसांसोबत राहून पोलिसांची दिशाभूल करत होती.

गुन्हे शाखेने तपास करून खरी माहिती समोर आणली

खुनाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी जुना विडी घरकुल येथील केकडे नगर येथे जाऊन पाहणी केली. कसोशीने तपास करत, नातेवाईकांकडून माहिती घेतली. अरुणा हिचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली. त्याचा सखोल तपास करत बाबासो बाळशंकर याच्या मोबाईलवर कॉल केला असता त्याचा फोन बंद होता. पोलिसांचा संशय अधिक बळावला.

संबंधित बातम्या : मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, मग मैदानात नेऊन महिलेला संपवलं, परभणीत थरार

प्रियकर बाबासो बाळशंकर हा सोलापूर शहरात रात्री ११ वाजता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी ताबडतोब मुळेगाव रोडवर सापळा लावला आणि रात्री ११ वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याचे कपडे काढून तपास सुरू केला असता, बाबासोच्या छातीवर अरुणा नाव गोंदलेले दिसून आले. अरुणा यासोबत तिने पती दशरथ नारायणकर याचा खून केले असल्याची माहिती दिली. खून केल्यानंतर दोघे पळून देखील जाणार होते.

अनैतिक संबंधात पतीचा हकनाक बळी

विवाहबाह्य किंवा अनैतिक संबंधाचा असा शेवट झाला. अरुणा नारायणकर व दशरथ नारायणकर या दाम्पत्यास बारा वर्षांची मुलगी आहे. अरुणा हिचे बाबासो बाळशंकर यासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या अनैतिक संबंधात पती अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी दशरथची गळा चिरून हत्या केली. अनैतिक संबंधाचा शेवट झाला आणि अरुणाने पती गमावला. पती, पत्नी आणि एक मुलगी अशा गोड संसारात तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव झाला आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं.

संबंधित बातम्या : गर्लफ्रेंडचा लग्नास नकार; बॉयफ्रेंडनं बहाणा करून हॉटेलात बोलावलं अन् मग…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.