बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी पीपीएफ गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि सोयीचा पर्याय आहे. जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असेल आणि काही कारणास्तव तुमचे खाते बंद किंवा निष्क्रिय झाले असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्ही तुमचे खाते पुन्हा सक्रिय करू शकता.
निष्क्रिय PPF खात्यामुळे होणारे नुकसान
तुमचे पीपीएफ खाते निष्क्रिय झाले असले तरी त्यामध्ये जमा रकमेवर तुम्हाला व्याज दिले जाते. पण खाते बंद होण्याचेही अनेक तोटे असतात. पहिला तोटा म्हणजे तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यावर कर्ज घेऊ शकत नाही. तसेच बंद पडलेले पीपीएफ खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल, परंतु तुम्ही तुमचे बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा सक्रिय करू शकता. यासाठी एक प्रक्रिया फॉलो करावी लागेल.
PPF खाते पुन्हा सुरू कसे करायचे
बंद किंवा निष्क्रिय झालेले पीपीएफ खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते असलेल्या पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत लेखी अर्ज करावा लागेल. त्यानंतर जितक्या वर्षांपर्यंत तुमचे खाते बंद होते, तुम्हाला प्रत्येक वर्षी ५०० रुपये जमा करावे लागतील. जर तुमचे पीपीएफ खाते पाच वर्षांसाठी बंद असेल, तर तुम्हाला २५०० रुपये दंड भरावा लागेल.
लॉकइन कालावधीनंतर नाही होणार सक्रिय
याशिवाय तुम्हाला चालू आर्थिक वर्षासाठीही ५०० रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुमचे पेमेंट लॅप्स झालेल्या प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील. पीपीएफ खात्याचा लॉकइन कालावधी १५ वर्षांचा असतो. अशा परिस्थितीत या कालावधीनंतर तुमचे खाते पुन्हा सक्रिय केले जाणार नाही. सरकारी नियमांनुसार पीपीएफ योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला मॅच्युरिटीनंतरही चालू ठेवायचे असेल तर तुम्ही पीपीएफ खात्याचा कालावधी पाच वर्षांसाठी वाढवू शकता.
पीपीएफ खाते सक्रिय करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
तुमचे पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँक किंवा पोस्टात लेखी आवेदनासह तुम्हाला काही कागदपत्रेही सादर करावी लागतील.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- शिधापत्रिका
- चालक परवाना
- बँक स्टेटमेंट