याप्रकरणी ओळख पटत नसल्याने पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. मात्र, नुकतेच आरोपींच्या कारवाया उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले. गुप्त माहितीवरून पोलिसांच्या पथकाने या जोडप्याचा शोध घेऊन त्यांना अखेर अटक केली. भाग्यश्री सिद्धप्पा पुजारी (वय ३१) आणि तिच्या प्रियकर सुपुत्र शंकरप्पा तलवार अशी या दोघांची नावं आहेत. ही हत्या केल्यानंतर त्यांनी लग्नही केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री आणि तिचा भाऊ निंगराजू सिद्धप्पा पुजारी हे जिगनी येथील एका कारखान्यात काम करत होते. ते वडेरमचनाहल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होते. भाग्यश्रीचे शंकरप्पासोबत प्रेमसंबंध होते, जो आधीच विवाहित होता. निंगाराजू याने या नात्याला विरोध केला होता. त्यामुळे भाग्यश्री आणि शंकरप्पा यांनी कट रचून निंगाराजूची हत्या केली होती.
जिगनी पोलिसांना मानवी शरीराच्या अवयवांनी भरलेली एक पिशवी सापडली होती. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं होतं. पोलिसांना त्यावेळी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन मिळाले होते. त्यावरून ते आरोपीच्या घरी पोहोचले. तेव्हा हे दोघंही घरी नव्हते. त्यावेळी शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी ज्या कारखान्यात काम करत होते तेथे जाऊन त्यांचे संपर्क तपशील मिळवले. त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहाची ओळख पटवली.
आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरल्याने पोलिसांनी कोर्टासमोर क्लोजर रिपोर्ट दाखल केला, मात्र आरोपींवर पाळत ठेवली होती. जुन्या प्रकरणांचा तपास करत असताना नाशिक येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली आणि एक पथक तेथे पोहोचले. आरोपींनी तोपर्यंत नोकरी बदलली असली तरी पोलिसांनी पुन्हा तपास सुरू करून या दोघांना अटक केली. त्यामुळे ८ वर्षांनंतर का होईना पण या दोघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे.