बस आता खूप झाले, कोलकाता हत्या, अत्याचाराच्या घटनांवर राष्ट्रपतींचे पत्र:लैंगिक अत्याचाराचा लवकरच विसर पडतो, हा एक घृणास्पद आजार – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे की, महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले पाहिजे. कोलकात्याच्या घटनेने देश हादरला आहे. मात्र, ही एकमेव घटना नाही. लहान मुले, बालवाडीच्या मुलींवरही अत्याचार होत आहे. देश संतप्त आहे आणि मीही. पण वेळ आलीय एक समाज म्हणून आपण स्वतःला काही कठीण प्रश्न विचारले पाहिजेत. २०१२ मध्ये दिल्लीतील निर्भया घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मात्र, नंतर देशाला लैंगिक अत्याचारांचा विसर पडला. यातून आपण काही धडा घेतला का? त्या म्हणाल्या, विसरण्याचा हा सामूहिक आजार अत्यंत घृणास्पद आहे. एका वृत्तसंस्थेला लिहिलेल्या पत्रात राष्ट्रपती म्हणाल्या, अलीकडेच राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन साजरे करण्यासाठी आलेल्या काही मुलांनी मला निर्भयासारख्या घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्याबाबत विचारले. मी त्यांना मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षणासारख्या गोष्टींबद्दल सांगितले असले तरी यामुळे त्यांना सुरक्षिततेची हमी मिळणार नाही. तर त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे समाजच देऊ शकतो. बंगाल बंद : अनेक ठिकाणी हिंसाचार-गोळीबार; ममता म्हणाल्या, बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिली जाईल
कोलकाता | महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून बुधवारी बंददरम्यान अनेक शहरांमध्ये हिंसाचार झाला. सत्ताधारी तृणमूल कार्यकर्ते व बंद समर्थकांमध्ये हाणामारीही झाली. भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्यावरही तृणमूल कार्यकर्त्यांनी २४ परगणा येथील भाटपारा येथे गोळीबार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, हे सुधारित विधेयक पुढील आठवड्यात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडले जाईल. राज्यपालांनी मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे न पाठवल्यास राजभवनासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ममतांनी दिला. आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशन) आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.