नांदेड : शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेला महत्त्वाचं यश मिळालं असून बियाणी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरला ताब्यात घेण्यात आलं आहे. ५ एप्रिल २०२२ रोजी संजय बियाणी यांची घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाइंड दहशतवादी हरविंदरसिंह रिंदा हा असून त्याच्या दोन शार्पशूटरने बियाणी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यातील फरार असलेला दुसरा मुख्य शूटर दीपक सुरेश रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने नेपाळ बॉर्डरवर पकडलं आहे.

या शूटरच्या शोधासाठी नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यांत जाऊन आली होती. आता शूटरच्या अटकेमुळे बियाणी यांच्या हत्येसह इतर घटनांतील अनेक बाबी समोर येणार आहेत. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची खंडणीच्या कारणावरून हरविंदरसिंह रिंदा याच्या साथीदाराने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते.

महिलेने पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचं सांगितलं, नंतर घडलं असं काही की पत्नीला झाली अटक

आरोपीवर विविध राज्यांमध्ये २५ गुन्हे

एनआयएने पकडलेल्या दीपक सुरेश रांगा या आरोपीच्या विरोधात देशभरातील विविध राज्यांमध्ये २५ गुन्हे दाखल आहेत. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश असून आता महाराष्ट्रातही गुन्हा नोंद झाला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे एसआयटीच्या पथकासह मागील काही दिवसांपासून परराज्यात तळ ठोकून होते. संजय बियाणी खून प्रकरणातील शूटर पकडला गेल्याने खुनाच्या कटात नेमके कोण-कोण सहभागी आहेत? याचा धागा पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. तसंच प्रकरणातील आरोपींची संख्याही वाढू शकते.

दरम्यान, एका महिन्यापूर्वी गुजरातमधून एका शूटरला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या दीपक सुरेश रांगा हा यंत्रणांना गुंगारा देत होता. दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक नांदेड शहर सोडून जात होते. बियाणी यांच्या हत्येतील शार्पशूटरला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *