रुग्णालयांविरोधात तक्रारी
धर्मादाय खासगी रुग्णालयांत गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असून, धर्मादाय आयुक्तालयातील प्रतिनिधी सचिव आहेत. खासगी धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांना उपचार नाकारत असल्याच्या तक्रारी लोक प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पुरंदरचे आमदार संजय जगताप, दौंडचे आमदार राहुल कुल, शिरूरचे आमदार अशोक पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, धर्मादाय आय़ुक्तालयातील अधीक्षक क्रांती जाधव यांच्यासह शहरातील ५८ धर्मादाय रुग्णालयांपैकी ३९ रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोर्टाच्या सूचनांना बगल
धर्मादाय खासगी रुग्णालयांच्या एकूण उत्पन्नातून दोन टक्के रक्कम बाजूला ठेवण्यात येते. या निधीतून गरीब रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. राज्यातील खासगी रुग्णालयांना सरकारकडून विविध सुविधा दिल्या जातात. त्या बदल्यात गरीब रुग्णांना मोफत अथवा सवलतीत उपचार देण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र, रुग्णालयांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
दरमहा बैठकीची सूचना
लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन रुग्णालयांना तंबी दिली आहे. रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या गरीब रुग्णांना नाकारू नका. त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करा. रुग्णालयांकडून निर्धन निधीचा कसा खर्च होतो, त्याचा ताळेबंद दर महिन्याला द्यावा. दरमहा समितीची बैठक घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रुग्णालयांसह धर्मादाय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना केली.
नावाजलेल्या हॉस्पिटलांविरोधात तक्रारी
– धर्मादाय खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना उपचार देण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार आल्या होत्या.
– त्याचा संदर्भ घेऊन आमदार राहुल कुल, जगताप, तापकीर आणि पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.
– शहरातील ‘रुबी’, ‘संचेती’; तसेच ‘इनलॅक्स बुधराणी’ या रुग्णालयांकडून उपचार नाकारले जातात.
– गरीब रुग्णांना लोकप्रतिनिधींनी पाठविल्यानंतर त्याला विनाकारण विभागांमधून फिरविले जाते. उत्पन्नाचा दाखला नाकारला जातो.
– रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही प्लास्टिक सर्जरी वगळता अन्य सर्व आजारांवर मोफत उपचार असूनही टाळाटाळ केली जाते.
– तसेच रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी किंवा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशा तक्रारी आमदारांनी केल्या.
शहरासह जिल्ह्यातील खासगी धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांना उपचारापासून दूर ठेवू नये. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घ्यावी. येत्या १५ दिवसांत धर्मादाय रुग्णालयांची बैठक बोलविण्याची सूचना समितीला केली आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी