नवी दिल्ली: भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान २३ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची टी-२० क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठीही भारताचा टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. वर्ल्ड कपदरम्यान पंड्याला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाडकडे भारतीय संघाचे नेतृत्व येण्याची शक्यता आहे.

ऋतुराजच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. सध्या सूर्या वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. त्यामुळे बीसीसीआयला ‘फ्रेश’ चेहरा हवा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि तिन्ही वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात येण्याची चर्चा आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्याची जास्त शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १० डिसेंबरपासून खेळली जाणार आहे.

आगामी टी-२० वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये जून-जुलैमध्ये होणार आहे. त्याआधी आयपीएल आहेच. तेव्हा संघबांधणी आतापासून करावी लागणार. त्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अर्शदीपसिंग, आवेश खान, मुकेशकुमार यांना संधी आहे. संजू सॅमसन, ईशान किशन, युझवेंद्र चहल यांनाही संघात स्थान मिळेल. अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप पुरेशी माहिती नाही.

गिल आजारी, किशनला संधी; वेंगसरकरांकडून सूर्यकुमारला प्लेइंग ११ मध्ये घेण्याचा सल्ला

निवड समितीला सईद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीही गृहीत धरावी लागणार आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा, रियान पराग, भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीला भुवीला दुर्लक्षित करून चालणार नाही. भुवीने देशांतर्गत स्पर्धेत सात लढतींत १६ विकेट घेतल्या आहेत. अभिषेकने दोन शतके, तीन अर्धशतकांसह ४८५ धावा केल्या आहेत.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी रायनसाठी खूप खास होती. त्याने बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत प्रभावी कामगिरी केली. ५१० धावा करण्यासोबतच त्याने ११ विकेट्सही घेतल्या. राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा आणि रिंकू सिंगसारख्या फलंदाजांच्या उपस्थितीत त्याला मधल्या फळीत स्थान मिळणे कठीण होईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *