म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः नैसर्गिक वायू अर्थात सीएनजी इंधनाच्या किंमतीत अलिकडे सहा रुपयांची कपात झाली असली तरी त्याआधी जवळपास १० महिन्यांत हे दर ३७ रुपयांनी वधारले होते. त्यानंतर युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात सीएनजीच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने मार्चअखेरपर्यंत ६.१३ डॉलर प्रतिदशलक्ष युनिट असलेले नैसर्गिक वायूचे दर सध्या (सप्टेंबरअखेरपर्यंत) ९.९२ डॉलर प्रतिदशलक्ष युनिटवर आहेत. ऑक्टोबरपासून नवे दर लागू होतील. त्याचवेळी आगामी काळ हा नवरात्रासह दिवाळीच्या सणाचा आहे. यामुळे सर्वत्र सीएनजी व पीएनजीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायू दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यासंबंधी ‘जेफरीज’ या संस्थेने याआधी केलेल्या सर्वेक्षणानुसार, ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान हे दर १२८ ते १,३०० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा मुंबईत मोठ्या प्रमाणात वापरात येणाऱ्या सीएनजी व स्वयंपाकासाठीच्या नैसर्गिक वायूवरदेखील मोठा परिणाम होण्याची शक्ता आहे.

मुंबईत जास्त परिणाम

भारतात तीनच कंपन्या सीएनजी आणि घरगुती स्वयंपाकाच्या नैसर्गिक वायूचा (पीएनजी) पुरवठा करतात. त्यामध्ये मुंबईतील महानगर गॅस, दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस व गुजरात गॅस यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक मोठे जाळे महानगर गॅस लिमिटेडचे आहे. महानगर गॅस व इंद्रप्रस्थ गॅस मिळून ८५ टक्के वायूचा पुरवठा करतात. त्यामुळेच या दरवाढीचा मोठा परिणाम मुंबईतील सीएनजी व पीएनजीवर होण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.