पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली. नैराश्यातून आपण आयुष्याची अखेर करत असल्याचं विद्यार्थ्याने लिहिल्याची माहिती आहे. मूळ जालन्याच्या असलेल्या त्रिगुण कावळेच्या आत्महत्येने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. आई वडील जीवाचे रान करून मुलाला पुण्यात शिकण्यासाठी पाठवतात. मात्र कुठल्याशा कारणावरुन विद्यार्थी टोकाचं पाऊल उलचून आपले जीवन संपवतात. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे.

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या त्रिगुण कावळे नामक विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या प्रकरणाची विश्रामबाग पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.

हेही वाचा : वसई बीचवर सापडलेली सूटकेस; थरकाप उडवणारी मर्डर मिस्ट्री, १३ महिन्यांनी गूढ उकललं

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्रिगुणने २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली होती. तो मूळ जालना जिल्ह्यामध्ये राहणारा होता. मात्र जानेवारी २०२१ पासून तो पुण्यातील गांजवे चौक येथे राहात होता.

आज दुपारच्या सुमारास त्याने खोलीत कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. चिठ्ठीत आपण नैराश्यातून आत्महत्या करत असून याला कुणालाही जबाबदार धरू नये असे नमूद करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी आपली स्वप्नं मनात घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. अनेक मुलांची घरची परिस्थिती हालाखीची असते. तरीही आई वडील त्यांना पुण्यात शिकायला पाठवतात. मात्र काहींना यात यश मिळते तर काहींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र नैराश्याचे नेमके काय कारण असते, हे मात्र अनेकदा समोर येत नाही. या घटनेतही असेच असून नैराश्य नेमके कसले आले, हे समजणे अत्यंत अवघड आहे. घटनेचा अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहे.

हेही वाचा : ७ वर्षांचा चिमुकला रडत घरी आला, १७ वर्षांच्या शेजाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published.