परिवारातील संघटनांपैकी अगदी मोजक्याच पदाधिकाऱ्यांची निवासव्यवस्था अन्यत्र करण्यात आली आहे. निवास व्यवस्थेशिवाय बैठक व्यवस्था, भोजन, सुरक्षा, माध्यम, विद्युत, प्रवास व वाहतूक तसेच अन्य असे व्यवस्थेचे सुमारे ३० विभाग(आयाम) निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे पाचशे स्वयंसेवक कार्यरत आहेत.
व्यवस्थेतील पूर्णवेळ प्रबंधकांसाठीही बैठक परिसरातच निवासव्यवस्थाही करण्यात आली आहे. बैठकीसाठी निमंत्रित पदाधिकारी आणि व्यवस्थेत कार्यरत स्वयंसेवकांना बारकोड असलेली ओळखपत्र देण्यात आली आहेत. त्याआधारेच त्यांना बैठकस्थळी प्रवेश दिला जात आहे. अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बैठकीसाठी येणार असल्याने येथे कडक पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
मोबाइल नेण्यासही बंदी
बैठकस्थळी बैठकीला अपेक्षित असलेल्या व्यक्तींसाठीच किंवा तेवढ्यापुरतीच बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय अन्य कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. बैठकीला जाण्यापूर्वी सर्वांनाच आपापले मोबाइल बाहेर जमा करूनच आत जाणे बंधनकारक आहे.
पुण्यातील पहिलीच समन्वय बैठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यात होत असलेली ही पहिलीच राष्ट्रीय समन्वय बैठक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाची कार्यकारिणी बैठक व परिवारातील संघटनांची समन्वय बैठक एकत्रितच होत असे. परंतु, संघाबरोबरच सर्व संघटनांचा आढावा घेण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संघाची कार्यकारिणी बैठक व परिवारातील संघटनांची आढावा बैठक स्वतंत्र करण्यात आली. त्यानुसार या संघटना व संघाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची वर्षातून एकदा समन्वय बैठक घेतली जाते.
ही बैठक सध्या पुण्यात पार पडत असून संघाची कार्यकारिणी बैठक नोव्हेंबरमध्ये भूज येथे होईल. दरम्यान, पुण्यात होत असलेली ही पहिलीच राष्ट्रीय समन्वय बैठक असल्याचे सूत्रांनी सांगितले.