भारत जोडोच्या या दुसऱ्या टप्प्याचा मार्ग गुजरात ते ईशान्य भारत असा असेल. त्यात मेघालयचा प्रामुख्याने समावेश आहे. दक्षिण भारतातील राज्यांनाही ही यात्रा जोडेल असे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील ज्येष्ठ पक्षनेत्यांची समिती सध्या भारत जोडो-२च्या मार्गाची आखणी करीत आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान रोज २३ ते २५ किलोमीटर पायी चालतात. भारत जोडो-२ यात्रेचा एकूण मार्ग साधारणतः ३४०० ते ३७०० किलोमीटर असेल.
महात्मा गांधी यांचे जन्मस्थान पोरबंदरपासून सुरू होऊन ही यात्रा पश्चिम-पूर्व असे मार्गक्रमण करेल. याचे सविस्तर नियोजन आगामी काळात जाहीर केले जाईल. या दरम्यान राहुल गांधी यांचा युरोप दौराही होऊन जाणार आहे.
राजस्थानातील किमान पाच जिल्ह्यातील चारशे ते पाचशे किलोमीटरचा टप्पा राहुल गांधी पदयात्रेद्वारे पार करतील. पोरबंदर, गोध्रा, दाहोद, अहमदाबाद (गुजरात), माउंट आबू , उदयपूर, झालावाड, कोटा (राजस्थान) रतलाम, झालावाड (मध्य प्रदेश) असा यात्रेचा सुरुवातीचा टप्पा असू शकतो.
१४५ दिवस चाललेल्या राहुल यांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्याने निर्भय भारतीयांची हृदयेही जोडली असे पक्षाने म्हटले आहे. भारत जोडो यात्रा उधळून लावण्यासाठी किंवा अयशस्वी करण्यासाठी अनेक कटकारस्थाने रचली गेली. पण अपूर्व जनसहभागामुळे ती यशस्वी झाली नाहीत. जुडेगा भारत, जीतेगा इंडिया, ही घोषणा सर्वांच्या हृदयात घर करून राहिली आहे असे पक्षप्रवक्ते पवन खेडा म्हणाले.
निवडणुकांचे मतदारसंघ यात्रेच्या कक्षेत
दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा किमान १०-१५ लोकसभा आणि ६० विधानसभा मतदारसंघ `कव्हर` करेल अशा पद्धतीने याचे नियोजन सुरू आहे. याच वर्षात नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये निवडणुका होणाऱ्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमधूनही यावेळची भारत जोडो यात्रा काढण्याचे नियोजन आहे.