वर्धा: ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने तापमानात अचानक वाढ नोंदविण्यात आली. या वाढीव तापमानामुळे सोयाबीनवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला. कुठे पीक पिवळे पडले तर कुठे सुकायला लागले आहे. बुरशीमुळे आत्ताच ३० टक्के सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. शंभर वर्षांत पहिल्यांदाच हा बुरशीजन्य आजार दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (उस वगळून) १४२.०२ लाख हेक्टर आहे. ११ सप्टेंबरपर्यंत १४१.०९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. यात प्रामुख्याने कापूस ४२.३० लाख हेक्टर, सोयाबीन ५०.७२५ लाख हेक्टर तर धान १५.२९ लाख हेक्टरवर आहे. या लागवड क्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असल्याने शेतकऱ्यांची मदार या पिकावर आहे. सध्या सोयाबीनवर खोडमाशी, पांढरी माशी, उंट अळी, चक्रीभूंगा, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, खोडकूज, पिवळा मोझॅक रोगांचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात बुरशी प्रादुर्भाव वाढला आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने दडी मारली. नंतर बरसलेल्या पावसाच्या बळावर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या.

ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला आणि तापमानात वाढ झाली. ३२ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहिल्याने पंधरवाड्यात सोयाबीन पिकाने रंग बदलविला. काही ठिकाणी येलो मोझॅक तर काही ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झाडांमधील हरितद्रव्य कमी झाल्याने शेंगा भरणे शक्य नाही. आत्ताच सुमारे २५-३० टक्के सोयाबीन हातचे गेल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कृषी सहाय्यक, कृषी मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सेलसुरा येथील कृषी विद्यालय यांच्या पाहणीतही हीच परिस्थिती दिसून आली आहे. तज्ज्ञ वातावरणाचा परिणाम सांगत असले तरी शेजारच्याच शेतांमध्ये रोग दिसून येत नसल्याने बियाण्यांचा दोष तर नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सरकार फक्त कागदोपत्री घोषणा करतं; पावसाच्या दांडीने शेतकऱ्यांचे बेहाल

वर्धा जिल्ह्यात आर्वी, कारंजा आणि आष्टी या तीन तालुक्यांत स्थिती बिकट झाली आहे. बाधित पिकांच्या सर्वेक्षणाची मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे. सोयाबीनवर आलेल्या संकटाची पाहणी तज्ज्ञांनी केली. नेमके कुठले औषध फवारावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. रोग आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नसल्याने पीक घरी येईल काय ही चिंता लागून आहे, असे खरांगणाच्या सरपंच नीलिमा अकलवार यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडली व्यथा

आर्वी तालुक्याच्या खरांगणा मोरांगणा मंडळातील शेतकऱ्यांनी ओढवलेली नैसर्गिक आपत्तीची आपबीती सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आमदार दादाराव केचे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. कृषी विभागाकडून अजूनही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले आहे.

अहवाल सरकारला देणार : शिवरकर

मागच्या शंभर वर्षांत सोयाबीनवर बुरशीजन्य असा रोग दिसलेला नाही. ऑगस्ट महिन्यातील तापमानवाढीचा हा परिणाम आहे. आम्ही सर्वेक्षण करून पंचनामे करणार आहोत. त्याचा अहवाल सरकारला सादर करू. सध्या २५-३० टक्के भागात ही परिस्थिती आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक शिवरकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्जबाजारीपणाला कंटाळले, विदर्भात यंदाच्या हंगामात १,५८४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *