राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे:निवडणुकीत बसलेल्या दणक्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे, यासाठी आम्ही स्वतःहून साद यापूर्वी घातली होती. आता जर त्यांनी साद घातली तर राज ठाकरे निर्णय घेतील. असे विधान मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केले आहे. तसेच माहीममध्ये भाजपने मनसेला एकटे पाडले असा आरोप सुद्धा महाजन यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला तसेच राज ठाकरे यांच्या मनसेला चांगलाच दणका बसला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश महाजन म्हणाले, जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, जी मंडळी दुसऱ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत होती, त्यांचे अस्तित्व पणाला लागले तेव्हा आमची गरज त्यांना वाटते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे, यासाठी आम्ही स्वतःहून साद यापूर्वी घातली होती. आता जर त्यांनी साद घातली तर राज ठाकरे निर्णय घेतील, असे महाजन म्हणाले. पुढे प्रकाश महाजन म्हणाले, समोरच्याची इच्छा काय आहे हे पाहिले जाईल. राज ठाकरे तर कधीही मैत्रीचा हात समोर करतात. पण आमचा पूर्वानुभव वेगळा आहे. अमित ठाकरे आजारी असताना त्यांनी आमचे नगरसेवक फोडले. ज्यांची सत्ता गेली त्यांना अस्वस्थता वाटू शकते, आम्ही सगळ्या गोष्टीला तोंड देऊ. पराभव आम्हाला नवीन नाही. त्यातून आम्ही उभारी घेऊ. आज मुंबई टोल फ्री झाला त्याचे यश मनसेचे आहे, असेही प्रकाश महाजन म्हणाले. प्रकाश महाजन भाजपवर आरोप करताना म्हणाले, माहीम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मनसेला एकट पाडले. दिलेला शब्द युतीच्या नावावर पाळला नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर वक्तव्य केले होते की, अमित ठाकरेंना आम्ही पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी युतीच्या नावावर माघार घेतली, राजकारणात शब्द पाळायचा असतो मोडायचा नसतो. भाजपने शब्द पाळला नाही. राज ठाकरे या सगळ्या पराभवावर आत्मचिंतन करतील, निराशा, हताशा येईल. पण ती तात्पुरती असते, त्यातून आम्ही बाहेर पडून लढू. मनसे तीन ते पाच जागा जिंकू अशी अपेक्षा मला होती. लाडक्या बहिणीमुळे प्रस्थापित पक्ष सुद्धा वाहून गेले, त्यात आमचे सुद्धा ते हाल झाले, असे प्रकाश महाजन म्हणाले आहेत.