नवी दिल्ली: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं गेल्या ४० दिवसांपासून मृत्यूविरोधात सुरू असलेलं युद्ध अखेर संपुष्टात आलं. बुधवारी, २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या विनोदबुद्धीनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राजू यांनी हसू आणलं होतं. त्यांच्या निधनाची बातमी जेव्हा आली तेव्हा प्रत्येकजण हळहळला.

जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं १० ऑगस्ट रोजी त्यांना एम्स इस्पितळात दाखल केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. सातत्यानं राजू यांच्या प्रकृतीची माहिती देणाऱ्या विविध बातम्या येत होत्या. त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचं सांगितलं जात असल्यानं ते लवकर बरे होतील, अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली आणि मृत्यूविरोधात सुरू असलेलं युद्ध राजू हरले.

राजू श्रीवास्तवांचा मृत्यू कसा झाला, सगळं ठीक होताना अचानक काय झालं?


राजू श्रीवास्तव त्यांच्या हसमुख अंदाजासाठी आणि दिलखुलास स्वभाावासाठी ओळखले जायचे. अनेकदा त्यांनी हसत हसत आपल्यावर अंत्यसंस्कार कसे व्हायला हवेत, याबद्दलची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांचे हे बोल त्याच्या जवळच्या मित्रमंडळींना प्रकर्षानं आठवत आहेत.

काय म्हणाले होते राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव अत्यंत हसमुख व्यक्तीमत्व होतं. अत्यंत संघर्ष करून त्यांनी आज हे यश मिळवलं होतं. राजू यांनी स्टँडअप कॉमेडीला एक नवीन ओळख मिळवून दिली. राजू हे आजच्या घडीला सर्वाधिक कमाई करणारे स्टँडअप कॉमेडियन होते. राजू यांच्या निधनानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या.अनेकांनी राजू यांनी त्यांचे अंत्यसंस्कार कसे व्हावेत याबद्दल व्यक्त केलेली इच्छा बोलून दाखवली. राजू यांनी सांगितलं होतं की, ‘जेव्हा माझ्यावर अंत्यंसंस्कार करण्याची वेळ येईल, तेव्हा ते हसतहसत करावे, ही माझी इच्छा आहे.’

राजू श्रीवास्तव यांची मुलगीही लढवय्यी, वीरता पुरस्कारानं झालाय सन्मान


गुरुवारी दिल्लीत होणार अंत्यसंस्कार

राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी, २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास निधन झालं. राजू यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर मनोरंजन विश्वाला धक्का बसला. राजू यांच्यावर गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी दिल्लीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.