नवी दिल्ली : आशिया कप २०२३ चे यजमानपद तर पाकिस्तानकडे आहेत. मात्र भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. अशा स्थितीत यंदा आशिया चषक पुन्हा हायब्रीड मॉडेलमध्ये होत आहे. जिथे आशिया कपचे सामने पाकिस्तान तसेच श्रीलंकेत खेळवले जात आहेत. भारत आपले सर्व सामने फक्त श्रीलंकेत खेळत आहे. आशिया कपच्या एकूण १३ सामन्यांपैकी ४ सामने पाकिस्तान तर ९ सामन्यांचे यजमान श्रीलंका करत आहे. अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो, श्रीलंकेतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र, यावेळी श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडत असून, त्याचा परिणाम आशिया कपवरही झाला आहे.
श्रीलंकेतील जवळपास प्रत्येक सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. भारताच्या दोन्ही सामन्यांना पावसाचा फटका बसला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आशिया चषकाची मजाच घालवली यात शंका नाही. मात्र आता फायनलमध्येही पाऊस पडला तर सामन्याचा निकाल कसा लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंवा १७ सप्टेंबरला पाऊस पडला आणि एकही चेंडू टाकला गेला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना राखीव दिवस म्हणून खेळवला जाईल की नाही?
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही
आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नसल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेने आधीच स्पष्ट केले आहे. म्हणजेच १७ सप्टेंबरला फायनलच्या दिवशी पाऊस पडला आणि सामना होऊ शकला नाही. तर अंतिम फेरीतील दोन संघांमध्ये ट्रॉफीची वाटणी होणार आहे.
आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदाही अंतिम सामना खेळला गेला नाही. ही स्वतःच एक धक्कादायक बाब आहे. पण यावेळी फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यातच व्हावी, जेणेकरून चाहत्यांना दोन्ही संघांमधील आणखी एक चुरशीचा सामना पाहण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना आहे.