म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय तथा राणीच्या बागेच्या नूतनीकरणावर गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. गेल्या चार वर्षांत म्हणजे सन २०१८ ते २०२१पर्यंत बागेच्या नूतनीकरणासाठी तब्बल २४३ कोटी ६५ लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये पेंग्विनच्या देखभालीवर सुमारे १९ कोटी ११ लाख रुपये खर्च झाला आहे. यामध्ये सुमारे ९.५० कोटी रुपयांच्या वार्षिक देखभाल खर्चाचाही समावेश आहे.

राणीच्या बागेच्या नूतनीकरणासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी पालिकेकडे मागितली होती. प्रशासनाने दिलेल्या दिलेल्या उत्तरात नूतनीकरणाचे दोन टप्पे आणि पेंग्विन देखभालीसाठी झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात स्वागत कक्ष (एंट्री प्लाझा), आतील लहान उद्याने (पॉकेट गार्डन), सार्वजनिक सुविधा, सीसीटीव्ही बसवणे, इंटरप्रिटेशन सेंटर, पेंग्विन प्रदर्शन, तृणभक्षकांसाठी विलगीकरण केंद्र, प्राणीसंग्रहालय, किचन कॉम्प्लेक्स, हेरिटेज बांधकामांचा जीर्णोद्धार यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा प्रकारच्या विविध कामांसाठी तब्बल ६२ कोटी ९१ लाख रुपये खर्च केले आहेत. या कामांमध्ये लांडगा, अस्वल, मांजरीचे कॉम्प्लेक्स, कोल्हा, तरस , बिबट्या, पक्षांचे पिंजरे, मगर, कासवांचे तलाव यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील अन्य कामांमध्ये वाघ, सिंह, सांबर, हरण, नीलगाय, चारशिंगा, हरीण, काळवीट आणि पक्षांचे पिंजरे तयार करण्यासाठी ५७ कोटी ११ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या या ‘घरां’ची किंमत प्रत्येकी ५ ते ९ कोटी असल्याचे समजते.

लवकरच नवीन सुसर, मगरी

राणीच्या बागेच्या पुनर्विकासात विविध कामे व नवीन प्राणी, पक्षी यांचे अधिवास बनवले जात आहेत. येथे सध्या दोन मगरी आणि पाच सुसरी आहे. मात्र पिंजऱ्याचे काम सुरू असल्याने सध्या त्यांना अलिप्त व पर्यटकांपासून दूर असलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. या मगरी आणि सुसरी वयाने मोठ्या असल्यामुळे त्या फारशा हालचाली करत नाहीत. त्यामुळे नव्याने मगरी आणण्यात येणार आहेत. यामध्ये चेन्नईच्या क्रोकोडाइल बँकमधून पाच, कोल्हापूर प्राणीसंग्रहालयामधून चार अशा नऊ मगर तर ओडिशातील नंदनकानन प्राणीसंग्रहालयातून आठ सुसर आणण्यात येणार आहेत. नव्या मगरी या कमी वयाच्या असतील. नव्या काचेच्या पिंजऱ्याजवळून पर्यटकांना मगरींना पाहण्याचा आनंद घेता येईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली आहे.

असा झाला नूतनीकरण खर्च (रु.)

पहिला टप्पा : ९५ कोटी

दुसरा टप्पा : ६२ कोटी ९१ लाख

प्राणी-पक्षी पिंजरे : ५७ कोटी ११ लाख

वर्ष वार्षिक देखभाल

सन २०१७-१८ २.३५ कोटी रु.

२०१८-२०१९ २.२१ कोटी रु.

२०१९-२० २.८४ कोटी रु.

२०२०-२१ २.१२ कोटी रु.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.