रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करा:त्यांनी भाजपच्या विरोधात काम केले, पराभवानंतर राम सातपुते यांचे गंभीर आरोप
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपविरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, असा गंभीर आरोप भाजप नेते व माजी आमदार राम सातपुते यांनी विधान परिषदेचे आमदार मोहिते पाटील यांच्यावर केला आहे. राम सातपुते म्हणाले, आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपविरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. येथील लढत अत्यंत चुरशीची झाली, मात्र अखेर राम सातपुते यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पराभवाचे खापर फोडले आहे. फेसबुक पोस्ट लिहीत राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात राम सातपुते यांनी टीका केली आहे. त्यांनी भाजपच्या विरोधात काम केले, पैसे वाटले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या, असे आरोप राम सातपुते यांनी केले आहे. तसेच त्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची देखील मागणी राम सातपुते यांनी केली आहे.