म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांत जानेवारी अखेरपर्यंत सुमारे ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाचा पाणीसाठा शून्य टक्क्यावर पोहोचला आहे.

पुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी यंदा पावसाने दडी मारली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरेसा, समाधानकारक असा पाऊस झालाच नाही. परिणामी, राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. त्यामुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा जून महिन्यापर्यंत पुरविताना पिण्यासह शेतीला पाणी देण्याचे आव्हान जलसंपदा विभागाला पेलावे लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक बिकट स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक आणि विदर्भातील धरणांमध्येही पाणीसाठा निम्म्यापर्यंत पोहोचला आहे.

खडकवासल्यातील पाणीसाठा निम्म्यावर

खडकवासला धरणात सध्या १.१९ अब्ज घनफूट (टीएमसी), पानशेतमध्ये ८.३० टीएमसी, वरसगावमध्ये ८.०२ टीएमसी आणि टेमघरमध्ये ०.४८ टीएमसी असा एकूण १७.९९ टीएमसी पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात आहे. म्हणजेच ६१.७७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जानेवारी अखेरीस खडकवासला धरण साखळीत २१.१८ टीएमसी (७२.६२ टक्के) पाणीसाठा होता.

उजनी धरणात उणे साठा

सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणांमध्ये यावर्षी पाणीसाठा कमी जमा झाला. संपूर्ण धरण पावसाळी हंगामात ६० टक्क्यांपर्यंत भरले होते. आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस उजनीतील पाणीसाठा शून्यावर पोहोचला आहे. परिणामी धरणातील मृतसाठ्याचा वापर करावा लागणार आहे. धरणाचा मृतसाठा ६३ ‘टीएमसी’पेक्षा अधिक आहे. सोलापूर शहराला पिण्यासाठी मृतसाठ्यातून २० टीएमसी पाणी द्यावे लागते. उजनीतून कालव्यासह नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरच्या नागरिकांना पिण्याची व्यवस्था झाली आहे.

धरणक्षेत्रातील पाणीसाठा ‘टीएमसी’मध्ये

धरण पाणीसाठा (‘टीएमसी’मध्ये) टक्के

खडकवासला १.१९ ६०.२६

पानशेत ८.३० ७७.९५

वरसगाव ८.०२ ६२.५२

टेमघर ०.४८ १२.९८

एकूण १७.९९ ६१.७०

सध्या खडकवासला प्रकल्पात १७.९९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलैअखेरपर्यंत पुणे शहराला पिण्याचे पाणी राखीव ठेवले जाईल. उर्वरित पाण्याच्या नियोजनाचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येईल – श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्पSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *