मुंबई- छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता प्रसाद ओक याने अनेक नाटकं आणि चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र ‘धर्मवीर’ चित्रपटातून त्याने अनेकांची बोलती बंद केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसादने चाहत्यांना अचंबित केलं. अनेक पुरस्कार आणि कौतुकाचा वर्षाव झाल्यावरही कायम जमिनीवर पाय रोवून उभा असणारा प्रसाद चाहत्यांसोबतही तितकाच जोडलेला असतो. प्रसाद सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नेहमीच धमाकेदार रील शेअर करत चाहत्यांचा मनोरंजन करत असतो. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने नातेवाइकांबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलं आहे. नातेवाईकांनी आपल्याला चांगलं असं काहीच दिलं नाही असं त्याने म्हटलं आहे.


नुकतीच प्रसादने युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली होती. त्याचा एक व्हिडिओ इसापनीती या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या मुलाखतीत प्रसाद म्हणतो, ‘माझ्या यशात मंजिरीचा १०० टक्के वाटा आहे. १९९६ साली तिने मला पुणे सोडून मुंबईला जाण्यास सांगितलं. तिच्यामुळेच आज मी इथे आहे. मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी १९९८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरही एक वर्ष मी एकटाच मुंबईत होतो. त्यानंतर १९९९ मध्ये मंजिरी मुंबईला आली. त्यानंतर आमचा संसार सुरू झाला. या सगळ्यात घर, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण सगळं मंजिरीने सांभाळलं. जेव्हा मी या क्षेत्रात आलो तेव्हा सुरुवातीला नातेवाईक म्हणायचे, हे काय क्षेत्र आहे? यात करिअर करायचं असतं का? चांगली बँकेत कुठेतरी नोकरी शोधली असतीस वगरे. तेव्हा असं म्हणणारे नातेवाईक आज त्यांच्याच मुलामुलींना माझ्यासोबत फोटो काढायला पाठवतात. २२ -२५ वर्षांची मुलं. नातेवाईकच हा प्रकारचं मला नकोसा वाटतो.’


पुढे प्रसाद म्हणाला, ‘कारण त्यांच्याकडून कधी मला काही चांगलं नाही मिळालं, दुर्दैवाने. आता ते ही मुलाखत ऐकत असतील तर त्यांना वाईट वाटेल. वाटु दे. मी त्याला काहीच करू शकत नाही. मला जे काही दिलं ते माझ्या बायकोने दिलं. माझ्यावरचे संस्कार माझ्या शिक्षकांनी केले. माझं गाणं माझ्या आईकडून आलं, नातेवाईकांनी काही नाही दिलं.’ त्याच्या या मतावर अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *