दक्षिण काश्मीरच्या जंगलात आढळले प्राचीन मंदिराचे अवशेष:राजधानी श्रीनगरपासून सुमारे 60 किलामीटरवरील निर्जन ठिकाण

दक्षिण काश्मीरच्या शाेपियां जिल्ह्यात गिर्याराेहक व स्थानिक गावकऱ्यांना हिरपाेराच्या जंगलात तीन प्राचीन शिवलिंग व हिंदू चिन्ह आढळून आले. त्रिभुजाकारातील विशाल अशा पाषाणात ही पिंड काेरण्यात आलेली आहे. हे ठिकाण घनदाट जंगलात आहे. तेथे केवळ पायी जाण्याचा मार्ग आहे. प्राचीन मुगल राेडपासून तीन किलाेमीटर व राजधानी श्रीनगरपासून सुमारे ६० किलाेमीटरवर आहे. हे ठिकाण सापडल्यानंतर स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाला व पुरातत्त्व विभागाला त्याची माहिती दिली. पुरातत्त्व विभागाने त्याच्या अभ्यासासाठी एक पथक रवाना केले. या टीमचे नेतृत्व करणारे अभिलेखागार पुरातत्त्व व संग्रहालयाचे सहायक संचालक मुश्ताक अहमद बेग म्हणाले, हे एक महत्त्वाचे व प्राचीन असे ठिकाण असावे असे दिसते. एका पाषाणात ते साकारण्यात आलेले आहे. त्याची उंची ३० फूट व लांबी ३० फूट आहे. आम्ही त्याचा अचूक असे माेजमाप व कालखंडाच्या नाेंदणीचे काम करत आहाेत. त्याबद्दलचा अहवाल एक आठवड्यात तयार हाेईल. त्यानंतर ताे सरकारला साेपवला जाईल. याेग्य अभ्यासानंतर या मूर्तींची माहिती मिळू शकेल. सध्या आम्ही सविस्तरपणे माहिती देऊ शकत नाही. १२०० वर्षे प्राचीन ठिकाण मूर्तींचा शाेध घेणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी एक गिर्याराेहक तस्लिम अहमद म्हणाले, आमच्या गिर्याराेहणाच्या वेळी मी या प्राचीन मूर्ती पाहिल्या. तेव्हा मला त्या ठिकाणी एखादे प्राचीन मंदिर असावे असे वाटले. उत्सुकता वाटली आणि मग स्थानिकांशी संवाद साधला. या ठिकाणास पातालपाल असे म्हटले जाते असे काही वृद्धांनी सांगितले. येथे एक संपन्न हिंदू गाव एक प्राचीन मंदिर हाेते. आठव्या शतकातील राजा ललितादित्य यांचे बंधू शूरवरम यांनी मंदिर व गाव वसवले हाेते. पुढे हे गाव बकाल झाले. लाेक गावाला विसरले. हे ठिकाण किमान १२०० वर्षे प्राचीन आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचे संरक्षण-संवर्धन केल्यास ते माेठे तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळ हाेऊ शकते. अनेक जंगलांत व इतर ठिकाणी प्राचीन अवशेष अशा प्रकारचे प्राचीन अवशेष जंगलांत तसेच इतर ठिकाणीदेखील आढळून येऊ शकतात असे तज्ज्ञांना वाटते. हे ठिकाण काश्मीरच्या हिंदू इतिहासाला दर्शवते. दहशतवादामुळे पूर्वी कुणीही दक्षिण काश्मीरच्या या जंगल भागात जाण्याचे धाडस दाखवत नव्हते. परंतु आता गिर्याराेहक व राेमांचक सफरींची आवड असलेल्या पर्यटक अशा ठिकाणांनी भेटी देतात. त्यांच्या नजरेस अशा गाेष्टी पडतात. ते साेशल मीडियावर लिहितात. सरकारने अशा वारशांचे संवर्धन करावे. काश्मीरच्या गाैरवशाली इतिहासाला उजेडात आणावे, असे तज्ज्ञांना वाटते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment