कोलंबो: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामना आता अवघ्या काही वेळात सुरु होणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे भारत-पाकिस्तानमधील हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. कोलंबोमध्ये रविवारी पावसाची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे. पण कोलंबोमधील हवामान स्वच्छ असल्याने सामना वेळेत सुरु होणार आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर रोहित शर्माने या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर केला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला- आमचा प्रथम फलंदाजी करण्याचा विचार होता. समोर आव्हान असेल, पण गेल्या वेळी आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. प्रत्येक खेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, परंतु एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा खेळाचा स्वभाव आहे, त्यामुळे आम्हाला तयारीसाठी चांगला वेळ मिळाला आणि आता आम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. या सामन्यासाठी संघात दोन बदल – बुमराह परतला आहे आणि श्रेयस अय्यरला नुकताच पुन्हा पाठदुखीचा त्रास झाला आहे त्यामुळे केएल राहुल त्याच्याजागी संघात परतला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियामध्ये दोन बदल पाहायला मिळाले आहेत. पहिला बदल दुखापतीमुळे तर दुसरा बदल भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे झाला आहे. शमीच्या जागी बुमराहने संघात स्थान मिळवले आहे. तर केएल राहुलने जखमी श्रेयस अय्यरची जागा घेतली आहे. रोहित शर्माने सांगितले की, श्रेयसला पाठीचा त्रास आहे. केएल राहुल देखील दुखापतीमुळे आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला होता. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना मार्च २०२३ मध्ये खेळला होता.
भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तानने एक दिवस आधी या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात खेळलेले खेळाडूच या सामन्यात मैदानात उतरतील.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन – फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.