माझ्या प्रकृतीबाबत अफवा पसरवली जात आहे:वरिष्ठ देतील ती जबाबदारी स्वीकारणार, दिलीप वळसे पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक
माझी तब्येत खालावली असल्याची अफवा पसरवली जात असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच माझी तब्येत उत्तम असून मइ पूर्ण कार्यक्षमतेने काम करत आहे. वरिष्ठ देतील ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे, असे म्हणत त्यांनी मंत्रिपदासाठी देखील इच्छुक असल्याचे सूचित केले असल्याचे दिसते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझ्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवली जात आहे. माझी तब्येत उत्तम आहे. मइ पूर्ण कार्यक्षमतेने काम करत आहे. वरिष्ठ देतील ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. मला कोणते पद द्यायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. परभणी येथे झालेल्या हिंसचारावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, परभणीतील तणावाबाबत मला फारशी कल्पना नाही. मात्र, राजकारणासाठी कोणीही असे चुकीचे प्रकार करू नयेत. संयम बाळगून शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच शरद पवार यांच्यावर वक्तव्य करणाऱ्यांनी सुसंस्कृतपणा राखावा, असा सल्ला देखील त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. दिलीप वळसेंच्या एका डावामुळे देवदत्त निकमांचा विजय हुलकावणीला गेला होता. वळसेंनी देवदत्त जयवंतराव निकमांच्या विरोधात देवदत्त शिवाजी निकमांना अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरवले होते. विशेष म्हणजे, शरद पवार समर्थक देवदत्त निकमांचे चिन्ह होते तुतारी वाजवणारा माणूस, तर अपक्ष देवदत्त निकमांचे चिन्ह होते ट्रॅपेट. उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निवडणुकांमध्ये ट्रॅपेट हे चिन्ह तुतारी या नावाने ओळखले जायचे. वळसेंनी याच साम्याचा फायदा उठवत ही रणनीती आखली, जी त्यांच्या विजयाचा आधार ठरली.