साई भक्तांना आता साईच्या समाधी समोर आरतीचा मान:शिर्डी संस्थाननचा महत्त्वाचा निर्णय; अंमलबजावणी देखील सुरू
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून दर्शन रांगेतील पहिल्या जोडीला मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान दिला जातो. याच धर्तीवर आता शिर्डी येथील साई संस्थानच्या वतीने देखील दोन साई भक्तांना आरतीसाठी समाधी जवळ सन्मानाने पुढे उभे राहण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीतील साई मंदिरात रोजच मध्यान्नारती, धुप आरती आणि रात्रीच्या वेळी शेज आरती केली जाते. या आरतीच्या वेळी भाविकांना संधी मिळणार असल्याचे साई संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. शिर्डी येथील साई संस्थानला देशभरातूनच नव्हे तर विदेशातून देखील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी दर्शन रांगेत कायमच गर्दी असते. साईंच्या आरती पूर्वी अर्धा तास आधी दर्शन रांग बंद करण्यात येते. यावेळी जे जोडपे सर्वात पुढे उभे असतील, अशा दोन साई भक्तांना आता साईबाबांची आरती करण्याची संधी मिळणार आहे. साई संस्थानच्या वतीने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य भक्तांसाठी नववर्षाची भेट ठरला आहे. निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी देखील साई संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यात वर्षातील पहिल्याच आरतीचा मान उत्तर प्रदेश मधील झाशी येथील भाविक मनीष रजक आणि पूजा रजक यांना मिळाला आहे. सकाळी सात वाजता ते आरतीसाठी रांगेत उभे राहिले होते. मात्र अचानक सकाळी 11 वाजता संस्थानच्या अधिकाऱ्यांनी त्यांना साईच्या समाधी समोर आरती साठी उभे केले. आमच्यासाठी ही अनपेक्षित घटना होती आणि आमचे जीवन कृतार्थ झाले असल्याची भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.