संगमनेर मतदारसंघाचा निकाल धक्कादायक:धनुष्यबाणाला मतदान का केले असेल? बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला आहे. बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा अनपेक्षित होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील दुःख व्यक्त केले असल्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. तसेच या निकालावर सत्यजित तांबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांची सभागृहातली कमी निश्चितच सर्व नेत्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरचा निकाल धक्कादायक आहे. 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केले असेल ते का केले असेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करू, असेही सत्यजित तांबे म्हणाले. आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली तेव्हा अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला, काय कारण असावेत, अशी विचारपूस करत त्यांच्या पराभवावर दुःख व्यक्त केले असल्याचे तांबे यांनी सांगितले. बाळासाहेब थोरात वरिष्ठ माणूस आहेत हा पराभव व्हायला नको होता, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले. काय म्हणाले अजित पवार?
सत्यजित तांबे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्यजित तांबे यांनी सांगितले की, अजितदादांनी मला विशेष करून विचारले की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला? काय कारणे असावेत. त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विशेष दुःख व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांच्या सारखा सीनियर माणूस पराभूत व्हायला नको होता. शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा गरजेचा होता, असे अजित पवार म्हणाले असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.