संघर्ष योद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे करीत आहेत तर अभिनेते रोहन पाटील हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कन्यारत्न, धुमस, मजनू, मुसंडी, खळगं यासारख्या चित्रपटात रोहन झळकला आहे. बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा या चित्रपटामुळे रोहनची लोकप्रियता वाढली.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी जो लढा उभारला आहे, तो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती आहे. सिनेमाचे चित्रीकरण येणाऱ्या डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून मार्च २०२४ पर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण आज जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्ते मनोज जरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले की, संघर्षयोद्धा सिनेमाचे चित्रिकरण सराटे गावातून सुरु होईल. जरांगेंच्या जन्मगावात आणि मुंबईतही शूटिंग होईल. जरांगेंचं १५ दिवसांचं उपोषण सर्वांना माहिती झालंय, पण जुना संघर्ष लोकांना माहिती नाही, असं दोलताडे म्हणाले.
सिनेमासाठी रिसर्च सुरु केला असून त्यांचे बालमित्र, शेजारी यांच्याशी चर्चा करुन अधिकाधिक माहिती मिळवली जात आहे. लवकरच स्क्रिप्ट लिहून तयार होईल. सिनेमाचे पोस्टर पाहून त्यांना आनंद झाला. त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती. त्यांनी सिनेमाला खूप शुभेच्छा दिल्या आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं, अशी माहिती दोलताडेंनी दिली.