मुंबई : सकाळी ७ वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी, एकामागून एक विचारलेले प्रश्न, पत्राचाळ प्रकरणात नवनवी माहिती सांगून द्यायला लाववेली उत्तरं, अशा सगळ्या तणावाच्या वातावरणात सुमारे ९ तासांनी ईडी अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना आपल्या ताब्यात घेतलं. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी राऊतांच्या घराबाहेर आले. यावेळी राऊतांनी आपल्या जॅकेटवर भगवं उपरणं घालून, आपल्या हाताची वज्रमूठ आवळून लढण्याचा निर्धार व्यक्त केला. जमलेल्या तमाम शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करुन त्यांच्या ‘लढाऊ बाण्याचं’ कौतुक केलं. “कोण आला रे कोण आला-शिवसेनेचा वाघ आला… झुकेंगे नही… आव्वाज कुणाचा-शिवसेनेचा” अशा घोषणांनी राऊतांच्या घराचा परिसर दणाणून गेला होता. तत्पूर्वी घरातून बाहेर पडतानाचा राऊतांचा भावूक व्हिडीओ समोर आला आहे. राऊत घरातून बाहेर पडताना त्यांचे कुटुंबीय अत्यंत भावूक झाले होते.

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ईडी कार्यालयात नेणार असल्याची कल्पना दिली. संजय राऊतांनाही ईडी आपल्याला ताब्यात घेणार, याची कुणकुण लागलीच होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात नेणार असा निरोप सांगताच काही क्षणांत राऊतांनी त्यांच्यासोबत जाण्याची तयारी सुरु केली. यावेळी राऊत कुटुंबीय अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊत यांच्या मातोश्रींनी त्यांचं औक्षण केलं. राऊतांनीही आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यांच्या आईने औक्षणाचं ताट ठेवताच राऊतांनी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत देखील तिथे उपस्थित होत्या. त्यांच्या पत्नीलाही त्यांनी मिठी मारुन धीर दिला. या १ मिनिटांच्या व्हिडीओमधून राऊत कुटुंबीय कमालीचं भावूक झाल्याचं दिसून येत आहे. यावेळी बाळासाहेबांच्या तसबिरीच्या साक्षीने तुला लेक लढणार आहे, तो डरणारा नाही, असं राऊतांनी आपल्या ‘मातोश्री’ला सांगितलं.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या घराबाहेर आले. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. “संजय राऊत तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ हैं…डरेंगे नही-लढेंगे, आव्वाज कुणाचा शिवसेनेचा…” अशा जोरदार घोषणांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याचा परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिकांच्या जोरदार घोषणांनी राऊतांच्या अंगातही उत्साह संचारला. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत घराबाहेर येताना गळ्यात भगवं उपरणं घातलं होतं. शिवसैनिकांचं समर्थन पाहून राऊतांनी आपले दोन्ही हात उंचावून, शिवसैनिकांना अभिवादन केलं. आपल्या गळ्यातील भगवं उपरणं हवेत फडकावून भगवा नेहमी फडकत राहिन, भगव्याला हरवणं सोपं नाही, असा इशाराच दिला. राऊतांच्या या कृतीनंतर शिवसैनिकांमध्ये जोरदार उत्साह संचारला. शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली. राऊतांनी आपली वज्रमूठ आवळून शिवसेनेसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याचं माध्यमांना सांगितलं.

राऊतांच्या ‘मातोश्रीं’च्या डोळ्यात अश्रू

दुसरीकडे याचवेळी राऊतांचं कुटुंब बंगल्याच्या गॅलरीमधून हा सगळा भावनिक प्रसंग पाहत होतं. राऊतांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू होते. तर राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही डोळ्याच्या कडा अश्रूंनी दाटल्या होत्या. तर तिसरीकडे ज्याप्रकरणी राऊतांवर ईडीने कारवाई केलीये, त्या पत्राचाळ प्रकरणाचा एकही कागद आमच्या घरात सापडला नाही, असं राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत ठासून सांगत होते. असं असलं तरी सुनील राऊतांच्या आरोपांचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी खंडन केलं. आमचा गृहपाठ पक्का आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.