संजय राऊत वेडे आहेत, मेंटल हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली:शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची बोचरी टीका
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे, अशा शब्दांत गायकवाड यांनी बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांनी इव्हीएमवर शंका घेत महायुतीच्या विजायवर प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय गायकवाड म्हणाले, इव्हीएममधून आदित्य ठाकरे हे देखील विजयी झाले आहेत. मग आता त्यावरही आक्षेप घेणार का? ठाकरे गटाचे लोकही निवडून आले आहेत न? त्यांचा हा रडीचा डाव आहे. महायुतीला मिळालेला विजय हा कामाचा परिणाम आहे. लाडक्या बहिणीचा परिणाम आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना धूळ चारली आहे, अशी टीका गायकवाड यांनी केली. संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे गुजराती लॉबी ठरवेल, तसेच सरकारचा शपथविधी हा गुजरातमधील स्टेडियममध्ये घ्यावा, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला होता. यावर संजय गायकवाड म्हणाले, त्या संजय राऊत यांचे कोणतेही विधान आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते वेडे आहेत. त्यांची आता मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. तसेच आता ते आयुष्यात कधीही खासदार होणार नाहीत, असेही संजय गायकवाड म्हणाले. काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरातची लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा गुजरातमध्ये त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातला मोदींच्या नावाने स्टेडियम आहे. तिथे जास्त लोक बसतात. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी सोहळा घ्यावा हे संयुक्तिक ठरेल. शिवतीर्थावर शपथविधी घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. वानखेडे स्टेडियमवर घेतला तर 106 हुतात्म्यांचा अपमान होईल. त्यामुळे त्यांनी शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी