संजय राऊत यांचे संतुलन बिघडले:तर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे आता घरी बसले; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना नाकारले आहे. मात्र, आता हे तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो, याची आम्हाला चिंता नसल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील यांनी या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर टीका केली आहे. आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे विजय मिळाला, तसाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील मिळणार असल्याचा दावा देखील विखे पाटील यांनी केला आहे. संजय राऊत यांना केवळ मुद्दा हवा असतो. त्यांनी आता स्वतःचे अस्तित्व गमावले आहे. राऊत यांचे संतुलन बिघडले असल्याचा आरोप देखील विखे पाटील यांनी केला. संजय राऊत यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. त्यांचे संतुलन बिघडण्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष स्वबळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात भाजपने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांमध्ये मोठे यश मिळणार असल्याचा दावा विखे पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीची सत्ता जाताच मतभेद समोर महाविकास आघाडीची बिघाडी होण्यास जास्त वेळ लागणार नसल्याचे मी या आधी देखील सांगितले होते. आघाडी ही भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाही. तर केवळ सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आले होते. त्यासाठी कोणी हिंदुत्व बाजूला सोडले तर कोणी आपल्या विचारधारेला बाजूला ठेवले असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मात्र आता सत्ता गेल्याबरोबरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर येण्यास सुरुवात झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे आता घरी बसले
भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून उद्धव ठाकरे हे सत्तेत सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटीव्ह सेट करून त्यांनी विजय संपादित केला. मात्र, विधानसभेला त्यांचा तो खोटा नरेटीव्ह सेट झाला नसल्याचा दावा विखे पाटील यांनी केला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे आता घरी बसले आहेत. काँग्रेस पक्षाचे तर अस्तित्वच रोहिले नसून त्या बद्दल मी सांगण्याचे काहीही कारण नसल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत देखील महाविकास आघाडी राहील, अशी स्थिती नसल्याचा दावा विखे पाटील यांनी केला आहे. महायुतीचा निर्णय नेते घेतील आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का? असाही प्रश्न विखे पाटील यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना विखे पाटील यांनी उत्तर देण्यास नकार दिला. तो माझा अधिकार नसल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. महायुती सोबत लढायचे की, स्वबळावर लढायचे? या सर्वांचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते घेतील. महायुतीमध्ये सोबत असणाऱ्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.